नवी दिल्ली : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या मुलगा उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्माची तुलना ही डेंग्यू, मलेरिया या आजारांशी करत या धर्माला पूर्णतः नष्ट करण्याचे विधान केले. ज्यानंतर देशातील धार्मिक वातावरणासह राजकीय वातावरण तापलेले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. उदयनिधी यांचे वडील एम. के. स्टॅलिन हे विरोधकांची आघाडी असलेल्या INDIA मधील प्रमुख आणि महत्त्वाचे नेते असून सुद्धा या आघाडीतील काही नेत्यांकडून उदयनिधी यांनी केलेल्या विधानाचा विरोध करण्यात आला. परंतु आता काँग्रेसच्या एका नेत्याकडूनच उदयनिधी यांचा समाचार घेण्यात आला आहे. (Congress leader criticized Udayanidhi by posting ‘this’ photo of British Prime Minister Rishi Sunak)
हेही वाचा – इंडिगो विमानात पुन्हा एकदा महिलेचा विनयभंग; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांचे उदाहरण देत काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांनी उदयनिधी यांना सनातनाच्या मुद्द्यावरून टोला लगावला आहे. X (ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी बोलताना ऋषी सुनक यांचा फोटो शेअर करत प्रमोद कृष्णम यांनी लिहिले आहे की, ‘हे सनातन आहे.’ काँग्रेस नेत्याने आपल्या पोस्टमध्ये दुसरे काहीही लिहिले नसून, सनातनवरील वादाच्या संदर्भात त्यांनी हे भाष्य केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी ही पोस्ट उदयनिधी यांना टॅग केली आहे.
यही “सनातन” है. @Udhaystalin pic.twitter.com/XtKzISY01P
— Acharya Pramod (@AcharyaPramodk) September 11, 2023
प्रमोद कृष्णम यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत बोलताना दिसत आहेत. परंतु, या फोटोमध्ये शेख हसीना या खुर्चीवर बसल्या आहेत. तर ऋषी सुनक हे अनवाणी आणि गुडघ्यावर बसलेले दिसून येत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे. या फोटोमधील सुनक यांचा साधेपणा आणि त्यांनी केलेला महिलेचा आदर यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सुद्धा ऋषी सुनक यांचा फोटो पोस्ट करत उदयनिधी स्टॅलिन यांना टोला लगावला आहे.
ब्रिटिश पंतप्रधान असलेले ऋषी सुनक हे दिल्लीमध्ये झालेल्या G-20 बैठकीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी दिल्लीतील पत्नीसह अक्षरधाम मंदिराला भेट दिली. सुनक आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते यावेळी मंदिरात पूजा देखील करण्यात आली. ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती भारतीय असून इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. त्यामुळे सुनक यांचे भारताचे फार जवळचे संबंध आहेत. सुनक यांना भारताचा जावई देखील म्हटले जाते आणि याबाबतचा उल्लेख स्वतः ऋषी सुनक यांनी केला होता.