…तर मोदी आणि शाहांनी २४ किलोमीटर चालून दाखवावं, काँग्रेस नेत्याचं प्रत्युत्तर

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेवरून भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पीएम मोदींनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा इव्हेंट असा उल्लेख केला होता. त्यावरून काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रा ही मुव्हमेंट आहे, इव्हेंट नाही. काँग्रेस आणि भारतीय राजकारणातील हा परिवर्तनकारी क्षण असून कोणताही इव्हेंट हा १४० दिवस चालत नाही. तीन चार तासांसाठी किंवा चार तासांसाठी इव्हेंट होत असतो, असं जयराम रमेश म्हणाले.

भारत जोडो यात्रा इव्हेंट असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दररोज २४ किलोमीटर चालून दाखवावं, असं आव्हान जयराम रमेश यांनी भाजपला दिलं आहे.

गुजरातमधील गांधीनगरच्या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०१७ साली लालकृष्ण अडवणी अर्ज भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी काही पत्रकारांनी मोदी तुमचे शिष्य आहेत का?, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना अडवाणी म्हणाले की, नरेंद्र मोदी हे माझे शिष्य नसून ते जगातील सर्वात चांगले इव्हेंट मॅनेजर आहेत. त्यामुळं ज्या लोकांचा इव्हेंट मॅनेज करण्यात हातखंडा आहे, त्या लोकांनी आमच्यावर इव्हेंट मॅनेजमेंटचा आरोप करू नये. भारतीय राजकारणातील हा परिवर्तनकारी क्षण असून कोणताही इव्हेंट हा १४० दिवस चालत नाही, असं जयराम रमेश यांनी म्हणत पीएम मोदींवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा : महापुरुषांच्या सन्मानासाठी कायदा करा, मोडणाऱ्यास राज्याबाहेर हाकलून लावा; संभाजीराजे