विदेशी दौऱ्यांवर असताना भारताविरोधात बोलणे ही राहुल गांधींची सवय आहे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं होतं. त्यावर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया देत एस जयशंकर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
राजकारण देशाबाहेर नेण्याची प्रथा…
काँग्रेसचे सचिव जयराम रमेश यांनी जयशंकर यांच्या वक्तव्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला आहे.ज्या व्यक्तीने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण देशाबाहेर नेण्याची प्रथा सुरू केली. ती व्यक्ती अशी आहे की, ज्यामुळे तुम्हाला मंत्रीपद मिळालं. ती व्यक्ती कोण आहे, हे तुम्ही जाणता. परंतु डॉक्टर मिनिस्टर तुम्ही ही गोष्ट स्वीकारू शकत नाही, असं जयराम रमेश यांनी म्हणत जयशंकर यांच्यावर हल्लाबोल केला.
भाजपने परराष्ट्रमंत्र्यांना जुनी स्क्रिप्ट दिली – रणदीप सुरजेवाला
जयराम रमेश यांच्यानंतर काँग्रेसचे अजून एक नेते आणि सचिव रणदीप सुरजेवाला यांनीही जयशंकर यांच्यावर निशाणा साधला होता. पंतप्रधानांनी मागील सरकारची थट्टा केली आणि देशातील ७० वर्षांपेक्षा अधिक जुन्या इतिहासावर प्रकाश टाकला. राहुल गांधी जे बोलले तेच खरे आहे की, आपल्या संवैधानिक संस्थांवर पद्धतशीरपणे हल्ला होत आहे. भाजपने परराष्ट्रमंत्र्यांना जुनी स्क्रिप्ट दिली असून त्यांनी नवीन स्क्रिप्ट वाचावी, असं सुरजेवाला म्हणाले.
राहुल गांधी काय म्हणाले?
मागील आठवड्यात राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली होती.
सध्याच्या सरकारमध्ये भारताची लोकशाही आणि संविधानाला धोका असल्याचे ते म्हणाले होते. तसेच त्यांनी अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांना, भारतात परत येऊन लोकशाहीसह भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी उभे राहण्याची विनंती केली होती.
मी भारतात उत्तर देईन – जयशंकर
एस जयशंकर यांना राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. परराष्ट्र मंत्री तेव्हा ब्रिक्स देशांच्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. यादरम्यान त्यांनी भारतीय वंशाच्या लोकांचीही भेट घेतली. तेव्हा एका तरुणाने राहुल गांधींचे नाव न घेता जयशंकर यांना विचारले की, अमेरिकेत काही लोकं भारताबाबत वक्तव्यं करत आहेत. त्यावर तुम्ह काय सांगाल. यावर परराष्ट्रमंत्री म्हणाले की, मी विदेशात जाऊन राजकारण करत नाही. मी विदेशात गेल्यावर राजकारण न करण्याचा प्रयत्न करतो. तथापि, मी भारतात या चर्चेसाठी तयार आहे, असंही जयशंकर म्हणाले.