काळी जादूसारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगणं बंद करा, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काळी जादूवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदींनी काळी जादूसारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगणं बंद करावं, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने काळी वस्त्रं परिधान करून आंदोलन केलं होतं. या आंदोलनाचे वर्णन मोदींनी काळी जादूसोबत केलं आहे.

राहुल गांधींनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदींना महागाई, बेरोजगारी दिसत नाहीये का?, अशी विचारणा राहुल गांधींनी केली आहे. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा खालावू नका. देशाला काळी जादूसारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगणं बंद करा. तसेच आपली काळी कृत्यं लपवू नका, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.

पानिपत येथील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी काँग्रेसचं नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली आहे. काही जण सध्या खूप नैराश्यात आहेत. नैराश्य दूर करण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी त्यांनी काळी जादू केली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

काही लोकांनी ५ ऑगस्ट रोजी काळी जादू करण्याचा प्रयत्न केला आहे. काळी वस्त्रे परिधान केल्यानंतर आपल्या सर्व समस्या सुटतील. नैराश्य दूर होईल. पण जादूटोणा आणि काळी जादू यांसारख्या अंधश्रद्धेत गुंतून ते जनतेचा विश्वास मिळवू शकत नाही, असं नरेंद्र मोदी म्हणाले.


हेही वाचा : आम्ही वाक्य पूर्ण करण्याच्या आत होते ‘ब्रेकिंग न्यूज’, सरन्यायाधीशांची माध्यमांवर टीका