Corona: अमेरिका फक्त घेणारच की काही देणार सुद्धा? शशी थरूर यांचा ट्रम्पना सवाल!

shashi-tharoor

भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा (hydroxychloroquine)पुरवठा केला नाही, तर आर्थिक निर्बंधांची धमकी देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भूमिकेवरून आता घुमजाव केलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रेट माणूस असून भारतासाठी त्यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा साठा जपून ठेवला आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी भारताने
हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवरील निर्बंध अंशत: काही अटींवर शिथिल केले. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारताचे आभार मानल्यानंतर आता अमेरिका परतफेड म्हणून भारताला काय देणार? अशी विचारणा केली जाऊ लागली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री शशी थरूर यांनी तर थेट ट्रम्प यांनाच एक अडचणीत टाकणारा सवाल केला आहे.

काय म्हणाले शशी थरूर?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘आभार प्रदर्शना’नंतर शशी थरूर यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये थरूर म्हणतात, ‘श्रीयुत डोनाल्ड ट्रम्प, भारताने अगदी निस्वार्थी भावनेतून अमेरिकेला गरज असलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा केला आहे. पण आता जर अमेरिकेच्या कोणत्या लॅबमध्ये कोरोनाच्या लसीचा शोध लागला, तर अमेरिका तिच्या पुरवठ्यामध्ये भारताला प्राधान्य देईल का?’

अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या वर गेला असताना मलेरियावर गुणकारी ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा कोरोनावर संभाव्य उपाय म्हणून वापर होऊ शकतो, असं अमेरिकेने जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या साठ्याची मागणी केली होती. मात्र, भारताने नकार दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बरंच आकांडतांडव केलं. अखेर भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवरची बंदी शिथिल केली. मात्र, निर्यात करताना आधी भारतासाठी पुरेसा साठा ठेवला जाईल, हे स्पष्ट करण्यात आलं.

Corona : अखेर डोनाल्ड ट्रम्प आले ताळ्यावर; म्हणाले, ‘भारताचं बरोबर’!