पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘तो’ फोटो राहुल गांधींनी सगळ्यांसमोर दाखवला, म्हणाले….

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोप करत हल्लाबोल केलाय.

Rahul Gandhi receives notice of breach of privilege

Rahul Gandhi in Lok Sabha: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत अनेक मुद्दे उपस्थित केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आणि भारत जोडो यात्रेचे अनुभव सांगितले. ते म्हणाले, ‘भारत जोडो यात्रेत काँग्रेसने लोकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि पक्षानेही आपली बाजू मांडली. काँग्रेसने यात्रेदरम्यान लहान मुले, महिला आणि वृद्धांशी संवाद साधला. लोकांनी त्यांच्या वेदना सांगितल्या.

यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत गौतम अदानी प्रकरणावरून नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कोणताही अनुभव नसताना अदानी यांना विमानतळ देण्यात आल्याचे ते म्हणाले. असे अनेक आरोप त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर केले. यादरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचा विमानात बसलेला एक जुना फोटो दाखवला. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना अडवत हे योग्य नसल्याचे सांगितले. सभापती ओम बिर्ला म्हणाले की, “सभागृहात कोणतेही पोस्टरबाजी करू नये. सत्ताधारी पक्षाकडे बोट दाखवत ओम बिर्ला म्हणाले की, त्यांनी राजस्थानची पोस्टर्सही आणली आहेत. हे अजिबात न्याय्य नाही.”

त्यानंतर राहुल गांधी काही थांबले नाहीत आणि म्हणाले, “२०१४ मध्ये, अदानी जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होता, माहित नाही काय जादू झाली आणि तो दुसऱ्या क्रमांकावर आला.” लोकांनी विचारले हे यश कसं मिळालं? आणि त्याचा भारताच्या पंतप्रधानांशी काय संबंध? हे संबंध अनेक वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते, असा खुलासा देखील त्यांना हा फोटो दाखवत केला.

यासोबत राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही जिथे जाल तिथे फक्त अदानींचा धंदा आहे. ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान लोकांनी मला विचारले की हिमाचलमध्ये सफरचंदांबद्दल बोललं की अदानी, काश्मीरमध्ये सफरचंदांबद्दल बोललं की अदानी बंदरांची चर्चा होते. अशा स्थितीत जनतेला प्रश्न पडतो की, अदानी प्रत्येक व्यवसायात यशस्वी कसा होतो?

२० वर्षात अदानींनी भाजपला किती पैसे दिले? आधी मोदी अदानीच्या जहाजात जायचे, आता अदानी मोदींच्या जहाजात जातात. मोदी आणि अदानी एकत्र काम करतात, असं देखील राहुल गांधी म्हणाले. असे अनेक प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय.