घरताज्या घडामोडीराहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा संकल्प

राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा संकल्प

Subscribe

काँग्रेस आज  ‘संकल्प दिवस’ साजरा करणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आज, शनिवारच्या वाढदिवसानिमित्त त्यांना २०२४ साली पंतप्रधान करण्याचा संकल्प प्रदेश काँग्रेसने सोडणार आहे. राहुल यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली.

कोरोनाचे संकट असल्याने  राहुल यांच्या वाढदिवसाला उत्सवी स्वरुप न देता गोरगरिब जनतेला रेशन, अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप तसेच कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांनाही मदत करण्याचा संकल्प काँग्रेसने केल्याची माहिती  नाना पटोले यांनी आज  दिली.

- Advertisement -

मागील दीड वर्षांपासून देश कोरोनाचा सामना करत आहे. या कोरोनाने शेतकरी, कष्टकरी, कामकरी, हातावरचे पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले. पंतप्रधानांनी कोरोना काळात जनतेच्या जिवीताशी खेळ केला असून ‘आपली प्रतिमा संवर्धन’ करण्यासाठी इव्हेंटबाजीवरच जास्त लक्ष दिले. कोरोनाने देशात विदारक चित्र असताना राहुलजींचा वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करणे काँग्रेस विचाराला पटणारे नाही. हे लक्षात घेऊन वाढदिवस हा ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे, असे पटोले म्हणाले.

त्यानुसार उद्या  राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस नेते आणि पदाधिकारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. तर पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, एलपीजी गॅसच्या महागाईविरोधात महिला काँग्रेस गॅस कार्यालय आणि पेट्रोल पंपासमोर संकल्प करणार आहेत. युवक काँग्रेस आणि एनएसयुआयचे कार्यकर्ते यावेळी बेरोजगारीविरोधात आंदोलन करून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतील, अशी माहिती पटोले यांनी दिली.

- Advertisement -

सुनील देशमुख यांची आज घरवापसी

दरम्यान, राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या दादर येथील नुतनीकरण केलेल्या टिळक भवन या मुख्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी राज्यमंत्री  डॉ. सुनील देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसह घरवापसी करणार आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -