Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशRohit Sharma : कंगनाने म्हटले होते धोबी का कुत्ता, रोहितवरून शमा मोहम्मदने पुन्हा डिवचले

Rohit Sharma : कंगनाने म्हटले होते धोबी का कुत्ता, रोहितवरून शमा मोहम्मदने पुन्हा डिवचले

Subscribe

नवी दिल्ली : एकीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ हा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण, दुसरीकडे काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माबद्दल केलेल्या टिपण्णीचे चांगलेच पडसाद उमटले. शमा मोहमद यांनी रोहितला जाड आणि अप्रभावी कर्णधार म्हणून टीका केली होती. यानंतर काँग्रेस पक्षाने मध्यस्थी करत शमा मोहम्मद यांना ते ट्विट मागे घ्यायला लावले होते. अशामध्ये पुन्हा एकदा शमा मोहम्मद यांनी बॉलीवूड अभिनेत्री आणि सध्या भाजपची खासदार असलेल्या कंगना रणौतचे एक जुने ट्विट काढत पुन्हा एकदा रोहित शर्माबद्दल केलेल्या विधानाची पाठराखण केली आहे. (Congress Shama Mohamed tweeted old tweet of Kangana Ranaut about Rohit Sharma)

हेही वाचा : IND vs AUS Semis : सामना बरोबरीत राहिल्यास सुपर ओव्हर होणार की नाही? ICC चा तो नियम चर्चेत

रोहित शर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांच्यावर टीका करताना क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, रोहित शर्माबद्दल केलेले विधान हे लज्जास्पद असल्याचे म्हटले. अशामध्ये या टीकेला उत्तर देताना शमा मोहम्मद यांनी कंगना रणौतच्या 2021 च्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला. यामध्ये कंगनाने शेतकऱ्यांच्या निषेधादरम्यान रोहित शर्मावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्या ट्विटमध्ये कंगनाने रोहितला “धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का” असे म्हणत त्याची खिल्ली उडवली होती आणि शेतकऱ्यांविरुद्ध बनवलेल्या कायद्यांना पाठींबा देण्याबद्दल बोलले होते. हे ट्विट शेअर करताना शमा मोहम्मद यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांना विचारले, “मनसुख मांडवीय, आता तुम्ही कंगना रणौतबद्दल काय म्हणाल?” असे म्हणत टोला लगावला.

शमा मोहम्मद यांनी आधी म्हंटले होते की, “रोहित शर्मा हा खेळाडू म्हणून जाड आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. तसेच भारताचा आतापर्यंतचा सर्वात अकार्यक्षम कर्णधार आहे” असे म्हणत टीका केली होती. यावरून मोठा वाद झाला. यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेतेही अस्वस्थ झाल्याचे दिसले. याबद्दल काँग्रेसने त्यांना फटकारले तसेच भविष्यात अशा प्रकारच्या टिप्पण्या टाळण्याचा सल्ला दिला. काँग्रेसने ताबडतोब शमा मोहम्मद यांना ट्विट काढून टाकण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी पोस्ट डिलीट केली. पक्षाच्या मीडिया सेलचे प्रमुख पवन खेरा म्हणाले की, शमा यांचे वक्तव्य काँग्रेसचे मत नव्हते. हा वाद अशा वेळी समोर आला आहे जेव्हा रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत आहे.

तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सौगत रॉय यांनी शमा मोहम्मद यांना पाठिंबा दिला. ते म्हणाले की, “काँग्रेस नेत्याने जे म्हटले ते बरोबर आहे. रोहित शर्मा संघात नसावा.” असे म्हणत टीका केली. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी शमा मोहम्मद आणि सौगत रॉय यांच्या विधानांवरून काँग्रेस तसेच तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधताना इंस्टाग्रामवर पोस्ट केले की, “काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने खेळाडूंना एकटे सोडले पाहिजे. कारण ते त्यांचे व्यावसायिक जीवन हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहेत.” मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले, “या पक्षांच्या नेत्यांनी टीका करणे आणि संघातील खेळाडूच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे फक्त अत्यंत लज्जास्पदच नाही तर पूर्णपणे निंदनीय आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केलेल्या कठोर परिश्रमांना तसेच त्यागांना कमी लेखतात,” असे ते म्हणाले.