Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशCongress : अदानींवर आरोप होताच काँग्रेसने व्हिडीओ शेअर करत मोदींवर साधला निशाणा

Congress : अदानींवर आरोप होताच काँग्रेसने व्हिडीओ शेअर करत मोदींवर साधला निशाणा

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेने आरोप केल्यानंतर काँग्रेसने आता अदानी आणि मोदींवर निशाणा साधला आहे. याबाबतचा व्हिडीओ काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

नवी दिल्ली : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची कथित फसवणूक आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाच देणे यांसारखे आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने हे आरोप केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे गौतम अदानी यांच्याशिवाय त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि अन्य काही सहकाऱ्यांचाही यात समावेश असून आता त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही काढण्यात आले आहे. या प्रकरणावरून आता काँग्रेसने अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर काँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला असून यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यांनी या व्हिडीओमध्ये मोदी हे गौतम अदानी यांचे एजंट असल्याचे म्हटले आहे. (Congress shared video and targeted PM Narendra Modi after America accused Gautam Adani)

X या सोशल मीडिया साइटवर काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून याबाबतचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानींच्या एजंटप्रमाणे काम करत आहेत, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. जेव्हा कधी मोदी विदेशात जातात, त्याच्या काही दिवसातच त्या देशातील कंत्राटे अदानींना मिळतात, असा आरोप काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. काँग्रेसने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये काही देशांची नावे सांगण्यात आली आहे, जिथे मोदींचा दौरा झाल्यानंतर अदानींना कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतर देशात जाऊन एजंटप्रमाणे काम करत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… US Bribery Case : त्वरित जेपीसी स्थापन करा, अदानी प्रकरणावरून काँग्रेसची पुन्हा मागणी

X या सोशल मीडिया साइटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, जून 2015 मध्ये मोदींनी बांग्लादेशला भेट दिली आणि तत्कालीन पंतप्रधान शेख हसिन यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन महिन्यात अदानींचा बांग्लादेशसोबत वीजपुरवठ्याचा करार झाला. यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये मोदींनी श्रीलंकेच्या पंतप्रधानांची भेट घेतली आणि काही महिन्यांनी अदानींना श्रीलंकेमध्ये विंड एनर्जीचा प्रोजेक्ट मिळाला. डिसेंबर 2023 मध्ये मोदींनी केनियाच्या राष्ट्रपतींची भेट घेतली आणि सहा महिन्यात अदानींना केनियातील विमानतळाचे कंत्राट मिळाले. मात्र याविरोधात निदर्शने झाल्याने त्या देशाच्या हायकोर्टाने हे कंत्राट रोखले, अशी माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच, याचाच अर्थ मोदींनी आपल्या परममित्राला कंत्राट मिळवून देण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. एवढेच नाही तर मोदींनी सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया, इस्रायल, तंझानिया आणि नेपाळशी संबंधित करारातही एजंटप्रमाणे काम केले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने व्हिडीओ पोस्ट करून केला आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये काँग्रेसने आपला पक्ष वारंवार अदानी यांच्याकडून करण्यात येणाऱ्या भ्रष्टाचाराला वाचा फोडल्याचे म्हटले आहे. मात्र, नरेंद्र मोदी पूर्ण ताकदीने अदानीला वाचवत आहे, कारण अदानींची चौकशी झाली तर याचा संबंध मोदींशी येणार आहे, असा दावाच काँग्रेसकडून करण्यात आला आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -