Coronavirus: ‘शिवराज पनौती’ मध्य प्रदेश काँग्रेसचा भाजपवर निशाणा

shivraj-singh-chouhan
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यासोबतच राज्यातले राजकारणही तापत आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रभाव सुरु होत असताना राज्यात सत्ता बदल झाला. काँग्रेसच्या कमलनाथ यांना बाजुला सारून शिवराज सिंह चौहान यांनी भाजपचे ‘कमल’ फुलवले. भाजपचा हा डाव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला असून काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना चक्क पनौती असे संबोधन केले आहे.

काँग्रेसने भाजपवर टिका करताना म्हटले आहे की, भाजप मध्य प्रदेशच्या जनतेला फसवत आहे. राज्यात कोरोना व्हायरसचे संकट वाढत चालले आहे. तरिही मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. आरोग्य खात्याला मंत्री दिलेला नाही. तसेच गृह मंत्र्याचाही प्रभार कुणाला दिलेला नाही. कोरोनाच्या संकटात जबाबदार पदावर कुणीही नसल्याचे जगातले हे एकमेव उदाहरण असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे. ही टिका केल्यानंतर काँग्रेसच्यावतीने एक ट्विट करण्यात आले. ज्यामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पनौती म्हटले आहे.

या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मध्य प्रदेशात कोरोनाच्या संसर्गाचा वेग दुप्पट, रुग्ण बरे होण्याचा वेग अर्धाच आणि रुग्ण दगावण्याचा वेग तीन पट आहे. मध्य प्रदेशला कुणाचीही तरी नजर लागली? शिवराज पनौती..”

याआधी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कोरोनाच्या संकटाला केंद्र सरकारच्या धोरणांना जबाबदार ठरविले होते. मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरु झाला होता. मात्र तरिही केंद्राने संसदेचे अधिवेशन स्थगित केले नाही. तसे केले असते तर मध्य प्रदेशची विधानसभा देखील चालू शकली नसती. संसद चालू ठेवून केंद्र सरकारने मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार पाडण्याचे कृत्य केले.

मध्य प्रदेशमध्ये सध्या कोरोनाचे ५६२ रुग्ण आहेत. यापैकी ४१ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रानंतर रुग्णांच्या मृत्यूमध्ये मध्य प्रदेश राज्याचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे रुग्णांची एकूण संख्या कमी असूनही इतर राज्यांच्या तुलनेत मृतांची संख्या जास्त आहे.