Homeदेश-विदेशCongress Vs BJP : संसद परिसरात धक्काबुक्की; राहुल गांधी म्हणाले- भाजप खासदारांनी...

Congress Vs BJP : संसद परिसरात धक्काबुक्की; राहुल गांधी म्हणाले- भाजप खासदारांनी अडवले, भाजपकडून हत्येच्या प्रयत्नाची तक्रार

Subscribe

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजप खासदारांना धक्का देण्याचा आरोप केला आहे. संसद परिसरात झालेल्या धक्काबुक्कीत दोन खासदार जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या धक्काबुक्की प्रकरणी भाजप आणि काँग्रेस दोन्ही बाजूंनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचाही आरोप करण्यात आला आहे.

संसद परिसरात गुरुवारी सकाळी धक्का-बुक्कीची घटना घडली. यावेळी ओडिशामधील बालासोर येथील भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी झाले. सारंगी यांचा आरोप आहे की, काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला, ती व्यक्ती त्यांच्यावर पडली. सारंगी जेव्हा माध्यमांसमोर आले तेव्हा त्यांच्या डोक्यावर लागलेले होते. सारंगी यांच्यासह फर्रुखाबाद येथील खासदार मुकेश राजपूत देखील या धक्काबुक्कीत जखमी झाले. या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि बांसुरी स्वराज यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

राहुल गांधी यांना जेव्हा धक्का-बुक्की प्रकरणाबद्दल विचारण्यात आले, ते म्हणाले की, भाजप खासदारांनी मला धमकावले, माझ्यासोबत धक्काबुक्की केली. संसदेचे मुख्य प्रवेशद्वार मकर गेट येथे भाजप खासदारांनी घेराव घालून त्यांना आत जाण्यापासून रोखले होते. संसदेत जाण्याचा प्रत्येक खासदाराचा अधिकार आहे. संसदेत जात असताना भाजप खासदारांकडून हा प्रकार झाला आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मला आणि खासदार प्रियंका गांधी यांना देखील भाजप खासदारांकडून धक्का-बुक्की झाली.

आरएमएल हॉस्पिटलटचे वैद्यकीय अधीक्षक अजय शुक्ला यांनी म्हटले आहे की. दोन्ही नेत्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे. आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिल्ली डीसीपी कार्यालयात जाऊन धक्काबुक्की प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा : Ambedkar row : आज आंबेडकर असते तर, त्यांच्यावरही ईडी, सीबीआय कारवाई; संजय राऊतांचा घणाघात

संसद परिसरात नेमके काय घडले? 

संसदेत गुरुवारी सकाळी इंडिया आघाडी आणि भाजप खासदारांचे आंदोलन सुरु होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे, त्याच्या निषेधार्थ आणि शहांच्या राजीनामा मागणीसाठी काँग्रेससह इंडिया आघाडीचे आंदोलन सुरु होते. याच दरम्यान दोन्ही बाजूंचे खासदार आमने-सामने आले. यानंतरच धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे.

राहुल गांधींनी धक्का दिला, प्रताप सारंगींचा आरोप

भाजप आणि काँग्रेस आंदोलनानंतर खासदार प्रताप सारंगी माध्यमांसमोर आले. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. रक्तही निघत होते. सारंगी यांनी राहुल गांधी यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला.

जखमी सारंगींची राहुल गांधींनी घेतली भेट

काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह जखमी प्रताप चंद्र सारंगी यांची भेट घेतली. मात्र सारंगी आणि त्यांच्यात काय बातचीत झाली, हे समोर येऊ शकले नाही.

यानंतर माध्यमांसमोर आलेले राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला की, खासदारांचा आरोप आहे की त्यांना धक्काबुक्की झाली आहे. यावर राहुल गांधी म्हणाले की, नाही, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये सर्वकाही असेल. हे संसदेचे प्रवेशद्वार आहे. मी आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. भाजप खासदारांनी मला रोखण्याचा प्रयत्न केला. मला धक्काबुक्की करायला लागले. धमकी द्यायला लागले. मात्र धक्काबुक्कीने काही होत नाही. संसदेत जाणे आमचा अधिकार आहे. भाजपचे सदस्य आम्हाला आत जाऊ देत नव्हते.

Edited by – Unmesh Khandale