नवी दिल्ली : पक्षांतर्गत कुरबुरींमुळे काही दिवसांपासून महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला गळती लागल्याचे चित्र आहे. आणि आणखी काही बडे नेते जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू आहे. नुकतेच महाराष्ट्र काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसच्याच एका जुन्या माजी नेत्याने पक्षांतर्गत कुरबुरीवर टीका केली आहे.
हेही वाचा – Indian Railways : देशातील आगळे-वेगळे रेल्वे स्थानक! एक भाग गुजरातमध्ये आणि दुसरा महाराष्ट्रात
डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी काँग्रेस नेता गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. काही लोकांची अकार्यक्षमता आणि अहंकार यामुळे काँग्रेससारखा जुना पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे, असे आझाद म्हणाले. मागच्या महिन्याभरात महाराष्ट्रातील तीन ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. काँग्रेसमधील काही लोकांची अकार्यक्षमता आणि अहंकारामुळे दुर्दैवाने काँग्रेस पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे. १३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर बुधवारी एका वृत्तसंस्थेशी बोलत असताना आझाद यांनी हा दावा केला.
गुलाम नबी आझाद म्हणाले, “मी आता काँग्रेसमध्ये नाही, त्यामुळे या मुद्द्यावर मी अधिक बोलू इच्छित नाही. ते योग्य देखील नाही. पण अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षासाठी मोठं योगदान दिलं होतं. त्यांचे वडिलही काँग्रेसचे मोठे नेते होते. तेही माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री होते. त्यामुळेच त्यांचे जाणे हे पक्षाचे नुकसान आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार नजीकच्या काळात आणखी काही नेते काँग्रेसमधून बाहेर पडणार आहेत. काँग्रेससाठी तो मोठा धक्का असेल.”
हेही वाचा – Atal Setu : अटल सेतूमुळे एमएमआरडीए चिंतेत, महिन्याभरात जमला ‘इतकाच’ महसूल
काँग्रेसला तारणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य
माझी संसदीय कारकीर्द महाराष्ट्रातून सुरू झाली. महाराष्ट्रातून मी लोकसभा लढवली होती. पहिल्यांदा महाराष्ट्रातूनच मी राज्यसभेवर गेलो होतो. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जे काँग्रेसला पुन्हा एकदा तारू शकते. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यातून काँग्रेस जवळपास संपुष्टात आली आहे. केवळ काही लोकांची अकार्यक्षमता आणि अहंकारामुळे पक्षाचा ऱ्हास होत आहे, ही दुर्दैवी बाब असल्याचेही गुलाम नबी आझाद यांनी म्हटले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी १३ फेब्रुवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह विधानसपरिषदेचे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनीही भाजपात प्रवेश केला. दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे, काँग्रेसमधून बाहेर पडताना अशोक चव्हाण यांनी कुणावरही आरोप केले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकून मुख्य राष्ट्रीय प्रवाहात काम करण्याची इच्छा असल्यामुळे भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचे ते म्हटले. तत्पूर्वी १० फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला. त्याआधी १४ जानेवारी रोजी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही काँग्रेसमधून बाहेर पडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.