Constitution Day: आजच्या दिवशी का साजरा केला जातो संविधान दिवस?

constitution day why we celebrate on 26 november

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी २६ नोव्हेंबर हा दिवस खूप खास आहे. कारण या दिवशी १९४९ साली आपण संविधानाचा स्वीकार केला होता आणि २६ जानेवारी १९५० पासून संविधान अंमलात आणले होते. त्यामुळे २६ नोव्हेंबर दिवशी संविधान दिन साजरा केला जातो आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या संविधानामुळे आपल्याला स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिक असल्याची भावना निर्माण होते. तसेच या संविधानात दिलेले मुलभूत अधिकार आपली ढाल बनून आपले हक्क देतात. तसेच यामध्ये दिलेल्या मुलभूत कर्तव्य आपल्याला जबाबदारीची आठवण करू देतात.

का साजरा केला जातो संविधान दिवस?

भारत सरकारने २०१५ साली राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंती दिवशी हा दिवशी संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला जात आहे. यामागचा हेतू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्याचा आहे.

भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे. यामधील काही भाग ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपानाच्या संविधानामधून घेतला आहे. यामध्ये देशातील नागरिकांचे मुलभूत अधिकार, कर्तव्य, सरकारची भूमिका, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार या संदर्भात दिले आहे. विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेचे काय काम आहे? देश चालवताना त्यांची काय भूमिका आहे? या सर्व गोष्टी संविधानात नमूद केल्या आहेत.

भारतीय संविधानाची मूळ प्रत १६ इंच रुंद आहे. तर २२ इंच लांब चर्मपत्र पानावर लिहिले आहे. संविधान हस्तलिखितात असून २५१ पृष्ठांचा त्यात समावेश आहे. संपूर्ण भारतीय संविधान तयार करण्यासाठी २ वर्ष ११ महिने १८ दिवस लागले होते. २६ नोव्हेंबर १९४९ साली संविधान लिहून पूर्ण झाले होते.

भारतीय संविधानाची मूळ प्रत प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली होती. उत्कृष्ट कॅलिग्राफीद्वारे इटॅलिक अक्षरात लिहिली होती. संविधानाच्या प्रत्येक पान शांतीनिकेतनच्या कलाकारांनी सजवले होते. संविधानाची मूळ प्रत हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये लिहिण्यात आली होती. भारतीय संविधान आजही संसदेत हेलियमने भरलेल्या बॉक्समध्ये सुरक्षित ठेवले आहे.