फोटोवरून कर्नाटकच्या महिला IAS-IPS अधिकाऱ्यांमध्ये वाद; गृहमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा

कर्नाटकमध्ये सध्या दोन उच्च पदावर असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या वादाने एकच चर्चा उठली आहे. डी रूपा या अधिकारी महिलेने रोहिणी सिंधुरी या प्रशासकीय महिला अधिकारीचे खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यामुळे या दोघींमधील वाद टोकाला पोहचला आहे.

Controversy among Karnataka women IAS-IPS officers over photo

दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या सार्वजनिक भांडणामुळे कर्नाटक प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत. हे प्रकरण इतके वाढले आहे की आता राज्याचे गृहमंत्री अराग ज्ञानेंद्र यांना कारवाईचा इशारा द्यावा लागला आहे. खरं तर, रविवारी भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी डी रूपा मौदगिल यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी रोहिणी सिंधुरी यांची खाजगी छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. तसेच रोहिणी सिंधुरी यांनी पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना तिचे फोटो पाठवून सेवा आचार नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा केला आहे.

डी रूपा यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर फोटो पोस्ट करत आरोप केला की, सिंधुरीने 2021 आणि 2022 मध्ये तीन आयएएस अधिकार्‍यांसोबत छायाचित्रे शेअर केली होती. इतकेच नाही तर एक दिवसापूर्वी डी रूपा यांनी सिंधुरी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची एक लांबलचक यादी जाहीर केली आणि याबाबत त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि मुख्य सचिव वंदिता शर्मा यांच्याकडेही तक्रार केली असल्याचे सांगितले आहे.

त्यानंतर सिंधुरी यांनी रविवारी एक निवेदन जारी केले की, डी रूपा तिच्या विरोधात खोटी, वैयक्तिक निंदा करण्याची मोहीम चालवत आहे आणि कारवाईची धमकी देत ​​आहे. सिंधुरी पुढे म्हणाल्या की, “माझी बदनामी करण्यासाठी डी रूपा यांनी सोशल मीडियावरून (माझी) छायाचित्रे आणि व्हॉट्सअॅप स्टेटसचे स्क्रीनशॉट गोळा केले. मी काही अधिकाऱ्यांना ही छायाचित्रे पाठवल्याचा आरोप तिने केला असल्याने, मी तिला त्यांची नावे उघड करण्याची विनंती करते.”

डी रूपा मौदगिल यांच्यावर शाब्दिक हल्ला करताना सिंधुरी म्हणाल्या की, ‘मानसिक आजार ही एक मोठी समस्या आहे, त्यासाठी औषध आणि समुपदेशनाची गरज आहे’. जेव्हा हा रोग जबाबदार पदांवर असलेल्या लोकांना होतो तेव्हा तो आणखी धोकादायक बनतो. IPS रूपा माझ्या विरोधात खोटी, वैयक्तिक बदनामी मोहीम चालवत आहेत.’

हेही वाचा – माझं काय चुकलं? पहाटेच्या शपथविधीवर भगतसिंह कोश्यारींची प्रतिक्रिया

या प्रकरणावर कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, या वादावर त्यांनी पोलीस प्रमुखांशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनाही याची माहिती आहे. आम्ही गप्प बसलेलो नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्या दोघी खूप वाईट वागत आहेत. अगदी सामान्य लोक सुद्धा रस्त्यावर अशा पद्धतीने बोलत नाहीत. त्यांना त्यांच्या वैयक्तिक मुद्द्यांवर वाट्टेल ते करू द्या, पण मीडियासमोर येऊन असे वागणे योग्य नाही.

डी रूपा या कर्नाटक हस्तशिल्प विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत आणि सिंधुरी हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एंडोमेंट्स विभागाच्या आयुक्त आहेत.