सावधान! पॉझिटिव्ह रेट वाढतोय… महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटकला केंद्राचा अलर्ट

CoronaVirus

देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह पाच राज्यांना अलर्ट दिला आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक या पाच राज्यात १० हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या पाच राज्यांनी डोकेदुखी वाढवल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोनाचे आव्हान अजून संपुष्टात आलेले नाही. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रित करण्यात आपण काही प्रमाणात अपयशी ठरल्याचे म्हणू शकतो. आपल्याला निरंतर प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी बजावले आहे. देशात गेल्या आठवड्यात एकूण पॉझिटिव्हीटी रेट १.६८ टक्के होता. पूर्वी हाच रेट ५.८६ टक्के होता. अरुणाचल प्रदेश आणि आसामसह २८ जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आणि १० टक्क्यांच्या आत आहे. म्हणजे या ठिकाणी संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. तर ३४ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्ह रेट आढळून आला आहे.

देशात आतापर्यंत ३.३९ कोटी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशभरात सध्या २.४४ लाख सक्रिय रुग्ण आहेत. देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, केरळमध्ये अजूनही सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाच्या रुग्ण संख्येत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळात सर्वाधिक ५० टक्के रुग्ण संख्या आढळून येत आहे. तर महाराष्ट्रात १५.०६ टक्के, तामिळनाडूत ६.८१ टक्के आणि मिझोराममध्ये ६.५८ टक्के रुग्ण आढळून येत आहेत. ५ टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या राज्यांमध्ये मिझोराम सर्वात वर आहे. मिझोराममध्ये २१.६४ टक्के आणि केरळमध्ये १३.७२ टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. तर सिक्कीम, मणिपूर आणि मेघालयाचा त्यानंतरचा नंबर आहे.