घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटडोनाल्ड ट्रम्पना साक्षात्कार; 'अमेरिकेत कोरोनाचे बळी १ लाखापर्यंत थांबले, तरी खूप झालं'!

डोनाल्ड ट्रम्पना साक्षात्कार; ‘अमेरिकेत कोरोनाचे बळी १ लाखापर्यंत थांबले, तरी खूप झालं’!

Subscribe

अमेरिकेत १ ते २ लाखांपर्यंत कोरोनाग्रस्तांचे मृत्यू होऊ शकतात, असा अंदाज अमेरिकन सरकारमधल्याच ज्येष्ठ अर्थतज्ज्ञाने वर्तवल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील कोरोना संकट किती गहिरं झालं आहे, त्याचा पुरावा देणारं विधान केलं आहे.

गेल्या कित्येक दशकांपासून महासत्ता म्हणून अवघ्या जगावर मर्दुमकी गाजवणाऱ्या अमेरिकेला अखेर एका न दिसणाऱ्या विषाणूनं नामोहरम केल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. अमेरिकेत आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार तब्बल १ लाख ४२ हजार १७८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २ हजार ४८४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर परिस्तितीचं गांभीर्य मान्य केलं आहे. अमेरिकेत फक्त १५ दिवसांसाठीच घोषित करण्यात आलेला आणि आज संपुष्टात येणारा लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, त्यासोबतच ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना काही महत्त्वाची विधानं केली आहेत. यामुळे, अमेरिका कोरोनाच्या तावडीत कशा पद्धतीने सापडला आहे, त्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

१ लाखांपर्यंत मृत्यू रोखू शकलो, तरी खूप झालं!

अमेरिकेत आत्तापर्यंत कोरोनामुळे २ हजार ४८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण ट्रम्प यांनी म्हटलं आहे की ‘हे मृत्यू आपण १ लाखांपर्यंत जरी रोखू शकलो, तरी आपण खूप चांगलं काम केलं, असं म्हणता येईल!’ अमेरिकेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अँथनी फाऊशी यांनी सकाळीच देशात १ ते २ लाख मृत्यू होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली होती. त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं हे विधान अमेरिकेत कोरोनाने किती आतपर्यंत हातपाय पसरले आहेत, याचंच द्योतक आहे.

- Advertisement -

अजून तर साथीचं खरं गंभीर रुप दिसायचंय…

अवघ्या १५ दिवसांपूर्वी म्हणजेच अमेरिकेत लॉकडाऊन जाहीर करण्याच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांतच अमेरिका कोरोनावर मात करेल असं निर्धोकपणे म्हटलं होतं. कोरोनाच्या साथीविषयी डोनाल्ड ट्रम्प यांचा दृष्टीकोन बेजबाबदार असल्याची टीका देखील त्यांच्यावर अमेरिकेतील अनेक नेत्यांनी आणि सिनेटच्या सदस्यांनी देखील केली होती. या पार्श्वभीमीवर अखेर ट्रम्प यांना साक्षात्कार झाला असून ‘अजून कोरोनाचं गंभीर रुप आपल्याला पाहायचं आहे’, असं विधान त्यांनी केलं आहे.

१ जूनपर्यंत सारंकाही सुरळीत होईल…

अमेरिकेतला लॉकडाऊ ३० एप्रिलपर्यंत वाढवल्यानंतर १ जूनपर्यंत परिस्थिती सामान्य होईल, असा दावा आणि आत्मविश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. मात्र, जर अमेरिकेत लाखोंनी कोरोनाबाधित सापडणार असतील, तर त्यांच्यासाठी कोणती उपाययोजना आहे, या प्रश्नाचं उत्तर मात्र या पत्रकार परिषदेत अनुत्तरीतच राहिलं.


CoronaUpdate : अमेरिकेत कोरोनामुळे १ ते २ लाख बळी जाऊ शकतात, ज्येष्ठ शास्त्रज्ञाचा अंदाज!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -