Corona: यामुळे आता दिल्लीतील वीकेंड कर्फ्यू हटवला जाणार, मुख्यमंत्री केजरीवालांनी एलजींना पाठवला प्रस्ताव

कोरोनाच्या रुग्णसंख्येतील वाढ पाहून केजरीवाल सरकारने वीकेंड कर्फ्यू लागू केला होता. जो शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून लागू होतो ते सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत असतो.

राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे दिल्लीत वीकेंड कर्फ्यूसह कडक निर्बंध लागू केले आहेत. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दिल्ली सरकारने वीकेंड कर्फ्यू हटवण्यासाठी उपराज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे शिफारस केली आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी एलजींना पाठवला आहे. या प्रस्तावात ऑड-ईव्हन पद्धत बंद करण्याचा आणि खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने चालू करण्यास परवानगी देण्यासाठी सांगितले आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येतील वाढ पाहून केजरीवाल सरकारने वीकेंड कर्फ्यू लागू केला होता. जो शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून लागू होतो ते सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत असतो. जर आता एलजींनी दिल्ली सरकारचा प्रस्ताव मंजूर केला तर दिल्लीतील वीकेंड कर्फ्यूसह कडक निर्बंध शिथिल होतील.

दरम्यान काल, गुरुवारी दिल्ली १२ हजार ३०६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि ४३ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत संक्रमण होण्याचा दरात घट होऊन २१.४८ टक्के झाला आहे. १० जून २०२१ नंतर दैनंदिन कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या ही आता सर्वाधिक संख्या आहे. दिल्लीत गेल्या वर्षी १० जूनला ४४ लोकांचा मृत्यू झाला होता. यावर्षी जानेवारीमध्ये आतापर्यंत ३९६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत बुधवारी ५७ हजार २९० नमुन्यांची चाचणी झाली होती, तर मंगळवारी ५७ हजार ७७६ नमुन्यांची चाचणी झाली होती. बुधवारी दिल्लीत ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर १३ हजार नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि संक्रमण दर २३.८६ टक्के होता. गेल्या आठवड्याच्या गुरुवारी दिल्लीत २८ हजार ८६७ नवे कोरोना रुग्ण आढळले होते. महामारी सुरू झाल्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्येत ही झालेली वाढ सर्वाधिक होती.


हेही वाचा – India Corona Update: देशात कोरोनासह ओमिक्रॉनचं संकट वाढलं! २४ तासांत ३,४७,२५४ नव्या रुग्णांची भर, ७०३ जणांचा मृत्यू