CoronaVirus : असं वागा जणू तुम्हालाच करोना झालाय – न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचं आवाहन

न्यूझीलंडमध्ये देखील करोनाचा फैलाव हळूहळू होऊ लागला असून त्या पार्श्वभूमीवर तिथल्या सरकारने राष्ट्रीय आणीबाणीसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.

New Zealand Prime Minister Jacinda Ardern

भारतात करोनाचे रुग्ण वाढत असतानाच ऑस्ट्रेलियाचा शेजारी देश असलेल्या न्यूझीलंडमध्ये देखील करोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. न्यूझीलंडमध्ये आत्तापर्यंत २०५ रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यानंतर आर्डर्न यांनी देशवायिसांना संबोधित करताना मोजक्या शब्दांमध्ये करोनाचं गांभीर्य समजावून सांगितलं आहे. ‘जर तुम्हाला हे कळत नसेल की आपण काय करावं आणि काय करू नये, तर असं समजा की तुम्हालाच करोना झाला आहे आणि त्या पद्धतीने वागा’, असं त्या म्हणाल्या.

करोनाबाधितांची संख्या वाढणार आहे!

लॉकडाऊन जाहीर करताना त्या म्हणाल्या, ‘आज मध्यरात्रीपासून आपण चार आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर करत आहोत. यातून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि त्याची साखळी तोडण्यासाठी हे आवश्यक आहे. ही परिस्थिती निवळण्याआधी गंभीर होणार आहे. पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात करोनाबाधितांची संख्या वाढणार आहे. तज्ज्ञांचा अंदाज असं सांगतो की न्यूझीलंडमध्ये हजारो करोनाबाधित सापडणार आहेत. त्यानंतरच ते कमी होतील.’

तुमचं फिरणं इतरांसाठी जीवघेणं

सध्या भारतात घरातच थांबण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र, त्याचं गांभीर्य अनेकांना अद्याप न आल्याचंच चित्र दिसत आहे. पण घरातच थांबण्याचा संदेश देशवासियांना देताना आर्डर्न म्हणतात, ‘तुमचं बाहेर पडणारं प्रत्येक पाऊल इतरांसाठी जीवघेणं ठरू शकतं. आपल्या सगळ्यांना मिळून याचा विचार करावा लागणार आहे. याच गोष्टीमुळे इतरांना भेटण्याच्या तुमच्या आनंदाला आम्ही आवर घालत आहोत. कारण आता आपण आपल्यापेक्षाही इतरांना अधिक प्राधान्य द्यायला हवं’.

फक्त जीवनावश्यक सेवा उपलब्ध

५० लाख लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडमध्ये इतर देशांच्या तुलनेत कमी लागण झाली आहे. मात्र, तिथल्या पंतप्रधानांना करोनाचा फैलाव देशात होण्याच्या आधीच त्याला आवर घालायचा आहे. त्यासाठी त्यांनी वेळीच देशात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला. सध्या न्यूझीलंडमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवा उपलब्ध आहेत.


CoronaVirus: १० कोटी लोकांसाठी १.५ लाख कोटींचे आर्थिक पॅकेज