Corona Vaccination: देशात कोणकोणत्या राज्यात मोफत लस? जाणून घ्या एका क्लिकवर

corona vaccination vaccine free of cost in uttar pradesh assam chhattisgarh madhya pradesh and bihar
मोफत लसीकरणावरुन ठाकरे सरकारमध्ये मतभेद

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसांला अडीच लाख कोरोनाबाधितांची रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीमेवर अधिक भर दिला जात असून अनेक राज्यांमध्ये मोफत लसीकरण केले जात आहे. दरम्यान केंद्राने १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना कोरोना लस घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर अनेक राज्य कोरोनाची लस मोफत देण्याबाबत घोषणा करत आहेत. त्यामुळे आज आपण कोणकोणत्या राज्यात कोरोना लस मोफत दिली जाणार आहे ते पाहणार आहोत.

उत्तर प्रदेश

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लस सर्वांना विनामूल्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधारण तासभर चालली. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा मुद्दा प्रमुख असल्याने यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यामुळे बैठकीत १ मे पासून राज्यातील सरकारी रुग्णालयात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना मोफत कोरोना लस देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. परंतु ज्या व्यक्ती कोरोना लस घेण्यास सक्षम असतील ते या लसीची किंमत देऊ शकतात. त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये लस घेण्याचे आवाहनही सरकारने केले आहे.

आसाम

युपी सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या पावलानंतर आसामने देखील त्याचप्रमाणे पाऊल उचलले. मंगळवारी आसाम सरकारने १८ वर्षांपासून ते ४५ वर्षापर्यंतच्या सर्व लोकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला. आसामचे आरोग्य मंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले की, ‘गेल्या वर्षांत आसाम आरोग्य निधीमध्ये जमा केलेला निधी लस खरेदीसाठी वापरला जाईल. तसेच आज आम्ही भारत बायोटेकच्या १ कोटी डोसची ऑडर्र दिली आहे.’

छत्तीसगढ 

आसामनंतर छत्तीसगढमध्ये मोफत लस देण्याबाबत घोषणा केली. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी घोषणा केली की, ‘राज्यात आता १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस दिली जाईल. कोणाकडूनही एकही रुपया घेतला जाणार नाही. याचा पूर्ण खर्च राज्यातले काँग्रेस सरकार उचलेल. आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी शक्य होईल तेवढी पावले उचलण्यास तयार आहे.’

मध्य प्रदेश

आता छत्तीसगढ पाठोपाठ मध्य प्रदेशने कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट करत घोषणा केली की, ‘आता राज्यात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना सरकार मोफत लस देईल.’

केरळ

केरळ राज्य सरकारने १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस मोफत देण्याबाबत निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

बिहार

यापूर्वी बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान नितीश सरकारने राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचे आश्वासन दिले होते. तेच आश्वासन त्यांनी पूर्ण करत १ मार्चपासून सुरू झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाण्याची घोषणा नितीश कुमार यांनी केली होती.


हेही वाचा – Covid-19 Vaccination: लसीकरण मोहिमेत जगात इंडिया भारी; ९५ दिवसात दिले १३ कोटी डोस