Coronavirus: सहा राज्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक; महाराष्ट्राचा मृत्यू दर किती?

गुजरात आणि पंजाबमध्ये मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे.

corona patients died
प्रातिनिधिक छायाचित्र

देशातील सर्वच राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. देशात दिवसागणीक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तर मृत्यूचं प्रमाण देखील वाढायला सुरुवात झाली आहे. सहा राज्यांमधील मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि यात गुजरात आणि पंजाब अग्रेसर आहे. बुधवारी देशात मृत्यूचे प्रमाण २.८९ टक्के तर गुजरात आणि पंजाबमध्ये अनुक्रमे ७.८८ आणि ७.६९ टक्के आहे. तथापि, दिलासादायक बातमी म्हणजे १३ राज्यात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. तज्ज्ञ म्हणतात की कोणत्याही रोगात मृत्यूचे प्रमाण ३ टक्क्यांहून अधिक असणे चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत मृत्यूचे प्रमाण २.६ वरून २.८९ पर्यंत वाढलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ६० जणांचा मृत्यू झाला आहे. पण जर रुग्ण आणि मृत्यूची तुलना केली तर मृत्यूचे प्रमाण गुजरात आणि पंजाबपेक्षा कमी आहे.

आयसीएमआरचे तज्ज्ञ म्हणतात की, कोरोनाला हरवायचं असेल तर प्रत्येक गोष्टींवर काम केलं पाहिजे. ज्या राज्यात मृत्यूदराचं प्रमाण जास्त आहे तिथे कोरोना संशयितांवर पाळत ठेवली जात आहे. तसंच तपासणीवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. या व्यतिरिक्त, ज्या रुग्णालयात कोरोनाचे रूग्ण दाखल आहेत, तिथल्या डॉक्टरांशी एम्सच्या डॉक्टरांची टीम सतत संपर्कात असते, असं आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी सांगितलं.


हेही वाचा – दिल्लीत कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला

जास्त रुग्ण, मृत्यूचे प्रमाण कमी

महाराष्ट्र वगळता सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळणार्‍या राज्यात मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत सध्या कमी आहे. कोरोनाच्या ६९० रुग्णांसह तामिळनाडू देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. परंतु मृत्यूचे प्रमाण १.०१ टक्के आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये ५७६ संसर्गित रुग्ण सापडले असून त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत मृत्यूचे प्रमाण १.५६ टक्के आहे.

बुधवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार मृत्यूदर

death rate

या राज्यात कारोनाग्रस्तांचा मृत्यू नाही

मणिपूर, मिझोरम, गोवा, अंदमान आणि निकोबार, आसाम, झारखंड, त्रिपुरा, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, पुडुचेरी, चंदीगड, लडाख आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही. या राज्यात आतापर्यंत कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे.