जगभरात करोनाने थैमान घातल्यानंतर आता भारतात थैमान घालायला सुरुवात केली आहे. यामुळे देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. करोनाशी सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार सज्ज झाले आहे. एकीकडे जगभरातून करोनावर ताबा मिळवण्यासाठी डॉक्टर, संशोधक प्रयत्न करत आहेत. मात्र, अयोध्येतील महंत परमहंस यांनी तर अजब दावा केला आहे. अयोध्येत करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत आणि सक्षम भारत महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. करोना नष्ट करायचा असेल तर ‘जय श्री राम’चा जयघोष करा, असा अजब सल्ला महंत परमहंस यांनी दिला आहे.
हेही वाचा – करोनाच्या चार संशयितांवर मुंबईत उपचार; राज्यात सहा दाखल
दरम्यान, महायज्ञाच्या वेळी त्यांनी संपूर्ण जगातून करोना नष्ट होणार असल्याचा दावा केला आहे. “जेव्हा एखादी गोष्ट लोकांच्या नियंत्रणात राहत नाही तेव्हा त्यात वैदिक प्रयोग केले जातात. वैदिक मंत्रांच्या सहाय्याने त्याला दूर केले जाते. करोनाचे जे किटाणू आहेत ज्यामुळे त्याचा फैलाव होत आहे त्यांचा खात्मा आजपासून होण्यास सुरुवात होणार आहे. करोनाचे रुग्ण आता ठणठणीत होतील. संपूर्ण जगातून करोना नष्ट होईल,” असे महंत परमहंस म्हणाले.