मुंबईत कोरोनाची दहशत; ओमिक्रॉन सब व्हेरिएंटचे आढळले चार नवे रुग्ण

आता रुग्णांवर पॅरासिटामॉलने उपचार केले जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांना रेमडेसिव्हिर देण्याची गरज नाही

coronavirus 3

महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची दहशत वाढत असल्याचे दिसतेय. अशातच सोमवारी मुंबईत ओमिक्रॉनच्या BA.4 या व्हेरिएंटचे तीन आणि BA.5 चा एक रुग्ण आढळला आहे. मात्र हे सर्व रुग्ण आजारातून बरे झाले आहे. अशी माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने सोमवारी दिली आहे. (Omicron Subvariants Detected In Mumbai)

BA.4 आणि BA.5 हे कोरोनाच्या अत्यंत सांसर्गिक ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सब व्हेरिएंट आहे. या ओमिक्रॉनमुळेच देशात जागतिक महामारीची तिसरी लाट आली होती. आरोग्य विभागाच्या कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात तीन रुग्णांमध्ये BA.4 तर एका रुग्णामध्ये BA.5 हा सब व्हेरिएंटची पुष्टी झाली आहे. या चारपैकी दोन मुली आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील मुलींचे वय 11 वर्षे आणि पुरुषांचे वय 40 ते 60 वर्षे आहे. सर्व रूग्णांनी होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केला आहे आणि ते आजारातून बरे झाले आहेत. अशी माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासांत देशात 8,084 नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी 36 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा फैलाव मुंबईत होत आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाला घाबरण्याची गरज नाही कारण बहुतेक रुग्णांमध्ये अत्यंत सौम्य लक्षणे आहेत आणि मृत्यूची संख्या देखील स्थिर आहे. तसेच आता रुग्णांवर पॅरासिटामॉलने उपचार केले जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांना रेमडेसिव्हिर देण्याची गरज नाही. (Mumbai Coronavirus Update)

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचे 9,354 रुग्ण आढळले होते, त्यापैकी 5,980 रुग्ण मुंबईत आढळले होते. मे महिन्यात 17 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी,1 जून ते 12 जून दरम्यान महाराष्ट्रात 23,941 संक्रमित आढळले आहेत, त्यापैकी 14,945 एकट्या मुंबईत आढळले आहेत. या महिन्यात 12 जणांचा मृत्यूही झाला आहे.

मुंबईचा गेल्या 24 तासाचा विचार केला असता, मुंबई शहरात 1,118 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, जी मागील दिवसाच्या तुलनेत 38 टक्के कमी आहे. महाराष्ट्रात उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 17,480 आहे, त्यापैकी मुंबईत सर्वाधिक 11,331 रुग्ण आहेत आणि ठाणे जिल्ह्यात 3,233 रुग्ण आहेत.


राहुल गांधींनी ईडी चौकशीदरम्यान बदलली अनेक प्रश्नांची उत्तरं, आज पुन्हा चौकशीला राहणार हजर