मुंबईत करोना व्हायरसचे ३ संशयित रुग्ण, पुण्यात २ रुग्ण

कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू

corona virus suspect dies in kolhapur
करोना व्हायरस

चीनमध्ये पसरलेल्या करोना व्हायरसचे तीन संशयित रुग्ण मुंबईत देखील आढळले आहेत. त्यांच्यावर सध्या पालिकेच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये विशेष स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर या दिवशी चीनच्या वुहान शहरात करोना व्हायरसने डोकं वर काढलं. त्यातून आतापर्यंत २५ हून अधिक जणांचा जीव घेतला आहे. करोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव भारतात होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

मुंबईत आढळलेले तीन रुग्ण हे चीनमधून आले आहेत. आतापर्यंत दोन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. पण, शुक्रवारी आणखी एक रुग्ण दाखल झाला आहे. त्यामुळे आता रुग्णांची संख्या तीन झाली आहे. या व्हायरसची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना थेट विमानतळावरुन कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत आहे. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे.

पुण्यात २ संशयित रुग्ण –

करोना व्हायरसचे पुण्यात २ रुग्ण आढळले आहेत. पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये या रुग्णांची तपासणी आणि विमानतळावरुन येणाऱ्या प्रवाशांच्या स्क्रिनिंगची सोय करण्यात आली आहे.

करोना व्हायरसी लक्षणे –

  • सर्दी, खोकला(कॉमन कोल्ड)
  • तीव्र ताप
  • श्वास घ्यायला त्रास होणे, श्वासास अडथळा
  • न्यूमोनिया, अतिसार
  • मूत्रपिंड निकामी होऊ शकतो.
  • शिंकणे, खोकणे, याद्वारे हवेमार्फत या विषाणूंचा प्रसार होत असावा. त्यामुळे, हा आजार होऊ नये यासाठी
  • प्रतिबंधात्मक खबरदारी घेणं गरजेचं आहे.

आजार होऊ नये म्हणून काय कराल ?

  • श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तिशी सहवास टाळणे.
  • हाताची नियमित स्वच्छतान शिजवलेले अथवा अपुरे शिजवलेले मांस खाऊ नये.
  • फळे, भाज्या न धुता खाऊ नये.

काय आहे करोना विषाणू ?

करोना हे विषाणूच्या एका समुहाचं नाव आहे. साध्या सर्दी खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्स यांसारख्या गंभीर आजारासाठी करोना विषाणू कारणीभूत असतात.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रिनिंग – केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, करोना बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग मुंबईसह देशातील सात विमानतळांवर सुरू करण्यात आले आहे. २३ जानेवारी पर्यंत मुंबई विमानतळावर १ हजार ७३९ प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. या मध्ये ६ प्रवासी हे मुंबई आणि पुण्यातील होते. यातील तिघांवर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 कोणाला खोकला असेल, ताप असेल तर लगेच रक्ताची तपासणी करावी. एकमेकांना त्याची लागण होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. चीन, हाँकाँग मध्ये गेलेल्या ३ जणांना करोनची लागण झाली आहे. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ४ वॉर्ड यासाठी ठेवण्यात आले आहेत. मुंबई महानगर पालिका, राज्यसरकार, केंद्र सरकार या व्हायरस बाबत सतर्क आहे. कस्तुरबामध्ये विशेष कक्ष करोना व्हायरस विभाग आहेत. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हाँकाँग, चीन मधील येणाऱ्या प्रवाश्यांच्या तपासणीसाठी विमानतळावर वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले आहेत. – सुरेश ककाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका