दिल्लीतील ‘सीआरपीएफ’चं मुख्यालय केलं सील; अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

कोरोनाबाधित अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. तथापि, ४० जणांना क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

crpf headquarter
दिल्लीतील ‘सीआरपीएफ’चं मुख्यालय केलं सील

राजधानी दिल्लीमध्ये असलेलं केंद्रीय राखीव पोलीस दलाचं (सीआरपीएफ) मुख्यालय सील करण्यात आलं आहे. देशाची राजधानी दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच वेळी, कोरोना विषाणूच्या विळख्यात आलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यामुळे तत्काळ सीआरपीएफ मुख्यालय सील करण्यात आलं.

भारतातील सर्वात मोठं निमलष्करी दल असून, सीआरपीएफच्या विशेष महासंचालक श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक सचिवाला कोरोनाची लागणं झाल्याचं रविवारी समोर आलं. त्यानंतर प्रशासनानं तातडीनं सीआरपीएफचं कार्यालय सील केलं. कोरोनाबाधित अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. ४० जणांना क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – IFSC मुंबईतून हलवण्याला पवारांचा विरोध, मोदींना लिहिले पत्र


कोरोनाच्या विळख्यात सीआरपीएफ आणि बीएसएफचे जवान

यापूर्वी, सीआरपीएफचे १३६ कर्मचारी आणि बीएसएफचे १७ जवानांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकारी म्हणाले की सीआरपीएफच्या १३५ जवान राष्ट्रीय राजधानीच्या मयूर विहार फेज -३ या भागात असलेल्या सीआरपीएफच्या ३१ व्या बटालियनचे आहेत. तर एक जवान हा दिल्लीतील २४६ व्या बटालियनचा आहे. गेल्या काही दिवसांत मोठ्या संख्येने कोरोना विषाणूचे रुग्ण समोर आल्यानंतर ३१ व्या बटालियनचा परिसर सील करण्यात आला आहे.