Video – पत्नीने हातगाडीतून स्मशानात नेला पतीचा मृतदेह!

कोरोनाच्या या वाढत्या संकटात अनेक काळीज पिळवटणाऱ्या काही घटना समोर येत आहेत. कोरोनाचा वाढचा कहर, कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि त्यानंतर मृतदेहाचे होणारे हाल या घटना वारंवार समोर येत आहेत. अशीच एक घटना कर्नाटकमधून समोर आली आहे. एका महिलेला आपल्या पतीचा मृतदेह हातगाडीत ठेवून स्मशानभूमीत न्यावा लागला. यावेळी कोणीही त्या महिलेला मदतीला पुढे आलं नाही. प्रत्येकाला कोरोना विषाणूची भीती वाटत होती, ज्यामुळे कोणीही जवळ गेलं नाही.

महिलेने सांगितले की, तिने आपल्या दोन मुलांसह पतीचा मृतदेह गाडीवर ठेवला व अंत्यदर्शनासाठी नेला. कुटुंब व नातेवाईकही मदतीसाठी आले नाहीत. प्रत्येकाला असे वाटत होते की माझा नवरा कोरोना विषाणूमुळे मरण पावला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, ही महिला आणि तिचे कुटुंब देखील आर्थिक आव्हानांशी झगडत आहे. पैसे नसल्यामुळे तिला आपल्या पतीचा मृतदेह हातगाडीतून न्यावा लागला.

बुधवारी रात्री ५५  वर्षीय सदाशिव हिराट्टी यांचे घरी निधन झाले. यावेळी त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी घरी नव्हते. मृताची पत्नी मुलगा आणि मुलगी घरी परत आली असता त्यांनी दरवाजा ठोठावला. सदाशिवने मात्र काहीच उत्तर दिले नाही, त्यानंतर घराचे दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी सदाशिव खुर्चीवर मृतावस्थेत आढळले.

असे म्हटले जात आहे की सदाशिव यांचे हृदयविकाराने निधन झाले. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, जेव्हा महिलेला कुठूनही मदत मिळू शकली नाही, तेव्हा तिने आपल्या पतीचा मृतदेह कापडात गुंडाळला आणि हातगाडीत ठेवला.


हे ही वाचा – अमानुषपणाचा कळस! माकडाला काळे फासून काठीने बडवले, व्हिडीओ व्हायरल!