Coronavirus in india: दिलासादायक! देशात पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; रिकव्हरी रेट ९२ टक्के पार

Coronavirus in india 1,27,510 new COVID19 cases, 2,55,287 discharges & 2,795 deaths in last 24 hrs
Coronavirus in india: दिलासादायक! देशात पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; रिकव्हरी रेट ९२ टक्के पार

देशातील कोरोनाची बिकट परिस्थिती आता सुधारताना दिसत आहे. काल देशात ५० दिवसांत नव्या कोरोबाधितांच्या संख्येत सर्वाधिक घट झाली होती. आज देखील ५४ दिवसांत नव्या रुग्णसंख्येत सर्वाधिक घट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख २७ हजार ५१० नव्या रुग्णांची वाढ झाली असून २ हजार ७९५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ लाख ५५ हजार २८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ८१ लाख ७५ हजार ४४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ३१ हजार ९८५ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ५९ लाख ४७ हजार ६२९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या देशात १८ लाख ९५ हजार ५२० जणांवर उपचार सुरू आहेत.

देशभरात आतापर्यंत २१ कोटी ६० लाख ४६ हजार ६३८ जणांचे लसीकरण पार पडले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.०९ टक्के झाले आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट ८.६४ टक्के असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ६.६२ टक्के इतका आहे. देशात ५४ दिवसांत सर्वाधिक कमी १.२७ लाख रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच सध्या नव्या रुग्णसंख्येत घटता कल कायम आहे. २४ तासांत १ लाख ३० हजार ५७२ रुग्ण कमी झाल्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या १८ लाख ९५ हजार ५२०वर पोहोचली आहे.

आयसीएमआरच्या माहितीनुसार, देशात ३१ मेपर्यंत ३४ कोटी ६७ लाख ९२ हजार २५७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १९ लाख २५ हजार ३७४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.


हेही वाचा – देशातील २६ राज्यात Mucormycosis संकट; २० हजार रुग्णांवर उपचार सुरू