देशातील कोरोना बाधितांचा आकडा ९० हजाराच्या वर, गाव-खेड्यातही पोहोचला कोरोना

स्थलांतरामुळे शहरातील कोरोना गाव खेड्यात पोहचल्याचं चित्र आहे.

coronavirus in india
प्रातिनिधिक छायाचित्र

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणीक वाढतच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा शनिवारी ९० हजाराच्या वर गेला. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, देशातील करोनाग्रस्तांची संख्या ९० हजार ६४८ झाली आहे. गेल्या आठ दिवसातील कोरोनाबाधित विदेशातून आलेले किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरातून गाव-खेड्यात पोहलले रूग्ण आहेत. शहरातून गावात गेलेल्या लोकांमुळे कोरोना गाव-खेड्यात पोहोचला आहे. दरम्यान, भारताने शुक्रवारी कोरोना बाधितांच्या संख्येत चीनला मागे टाकलं.

याशिवाय, देशातील मोठ्या शहरांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. एकूण कोरोना बाधितांच्या संख्येपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त रूग्ण मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या पाच शहरातील आहेत. या पाच शहरातील कोरोना बाधितांची संख्या जवळपास ४६ हजार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या २ हजार ८७१ एवढी आहे. तर आतापर्यंत ३४ हजार २२४ रुग्ण बरे झाले आहेत.


हेही वाचा – गावकर्‍यांचा विरोध न जुमानता पुणे-मुंबईकरांनी गाठले कोकण


दरम्यान, आज रविवार रात्री लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार असून सोमवारपासून चौथ्या टप्याला सुरूवात होणार आहे. चौथ्या टप्यात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आर्थिक व्यवहारांना सुट मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहता लॉकडाऊन संपण्याची शक्यता धूसर आहे.