करोनाच्या भीतीने आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

safdarjang hospital delhi

चीन, इटली आणि अमेरिकेनंतर भारतातही करोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. करोनाची लागण आपल्याला होऊ नये म्हणून अनेकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतात आतापर्यंत करोना विषाणूने १८ लोकांचे बळी घेतले आहेत. करोनाच्या भीतीपोटीच दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी एका युवकाने सातव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली होती. २३ वर्षीय या युवकाचा करोनाचा रिपोर्ट आज आलाय. ज्यामध्ये त्याची टेस्ट निगेटिव्ह दाखवत आहे. त्यामुळे भीतीमुळे या तरुणाचा नाहक जीव गेल्याबद्दल दिल्लीत हळहळ व्यक्त होत आहे.

चरणजीत सिंह नावाचा हा तरुण १८ मार्च रोजी सिडनीवरुन दिल्ली विमानतळावर पोहोचला होता. एक वर्षापासून तो ऑस्ट्रेलियात राहत होता. मुळचा पंजाबचा असलेल्या चरणजीतला विमानतळावर आल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवून लागला होता. त्यामुळे सफदरजंग हॉस्पिटलमध्ये त्याला चाचणीसाठी आणण्यात आले होते. मात्र हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्याने हॉस्पिटलच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती.

हे वाचा – इस्लामपूरमध्ये आढळले आणखी १२ करोना पॉझिटिव्ह; सांगलीची संख्या २३

आत्महत्येपुर्वी रुग्णालयातील डॉक्टरांनी तरुणाच्या गळ्यातील स्त्राव तपासणीसाठी घेतला होता. त्यावेळीच या तरुणाला आपण करोना बाधित आहोत, अशा संशय आला. रात्री ९ वाजता त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर ९.३० वाजता त्याने विलगीकरण कक्षातील दरवाजा उघडून सातव्या मजल्यावरुन उडी टाकली होती. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता.