coronavirus : सर्व राज्यांमधील कोरोना निर्बंध हटणार? केंद्राने पत्र लिहून केल्या ‘या’ सूचना

coronavirus union health secretary writes to all states asks them to review and amend or end additional covid19 restrictions
coronavirus : सर्व राज्यांधील कोव्हिड निर्बंध हटणार? केंद्राने पत्र लिहून केल्या 'या' सूचना

भारतात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी होतोय. रोज नोंदवल्या जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी होतेय. कोरोना रुग्णसंख्येत होणारी ही घसरण कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच संदर्भात आता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना कोरोनासंबंधीत निर्बंधांबाबत नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. याचे पत्रही केंद्राने सर्व राज्यांना पाठवले आहे.

या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लिहिले की, देशात कोरोना महामारी हळूहळू कमी होत असल्याने सर्व राज्यांमधील अतिरिक्त कोव्हिड निर्बंधांबाबत पुर्नविचार करून सुधारणा करत निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात करु शकतात. मंत्रालयाच्या या पत्रात करोनाची आकडेवारीही देण्यात आली आहे.

आकडेवारी बाबत पत्रात म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 27409 रुग्ण समोर आले आहेत. तर गेल्या आठवड्यात हाच आकडा 50 हजारांच्या पुढे गेला होता. त्याचवेळी पॉझिटिव्हिटी दर देखील 15 फेब्रुवारीला 3.63 टक्क्यांपर्यंत खाली आला.

भूषण यांनी पत्रात असेही म्हटले की, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनीही दररोज रुग्णांच्या घटत्या पातळीवर आणि संसर्गाच्या प्रसारणावर निरीक्षण करणे सुरु ठेवावे. या कोरोना साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी पाच स्तरीय धोरण देखील बनवू शकतात. ज्यामध्ये टेस्ट-ट्रॅक- ट्रीट-वॅक्सीनेशन आणि कोरोनासंबंधीत नियमांचे व्यवस्थित पालन करणे. असू शकते.

देशात कोरोनाचे 30,615 नवे रुग्ण

भारतात बुधवारी कोरोनाच्या 30,615 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4,27,23,558 वर पोहोचली आहे, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,70,240 वर खाली आली आहे.

बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आणखी 514 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 5,09,872 झाली आहे. सलग 10 व्या दिवशी कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उपचाराधीन रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.87 टक्के आहे, तर कोरोनातून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 97.94 टक्के झाला आहे.

देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 2.45 टक्के

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाच्या दैनंदिन संसर्गाचा दर 2.45 टक्के आहे आणि साप्ताहिक संसर्ग दर 3.32 टक्के आहे. या संसर्गजन्य आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या 4,18,43,446 झाली आहे. संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे. देशव्यापी अँटी कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 173.86 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 5,09,872 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, त्यापैकी महाराष्ट्रात 1,43,451, केरळमध्ये 62,681, कर्नाटकात 39,691, तामिळनाडूमध्ये 37,946, दिल्लीत 26,081, दिल्लीत 23,404 उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये 21,061 लोकांचा यात मृत्यू झाला.