CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरूच; २४ तासांत २ हजारहून अधिक जणांचा बळी!

जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळले असून आतापर्यंत १० लाखांहून अधिक रुग्णांची संख्या झाली आहे.

US Corona Update

चीनमधून फैलाव झालेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगावर संकट ओढावलं आहे. संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे जगभरातील २ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण बळी पडले आहेत. अमेरिकेत कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत जवळपास २ हजार २०० जणांहून अधिक रुग्ण मृत्यूमुखी पडले आहे.

अमेरिकेत वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाचे १० लाख ३५ हजार ७६५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ५९ हजार २६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच दिलासा देणारी बाब म्हणजे १ लाख ४२ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३ लाख १ हजार ४५० रुग्ण आढळले असून २३ हजार १४४ जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिके पाठोपाठ इटलीमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण बळी पडले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत २७ हजार ३५९ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख १ हजार ५०५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर स्पेन, फ्रान्स, ब्रिटन देशात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

भारतात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत भारतात ३१ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: मोदीजी तुम्ही सांगा आम्ही कोरोनाशी लढू की उपासमारीशी…