घरदेश-विदेशदहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना भुर्दंड लावण्याची गरज, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना भुर्दंड लावण्याची गरज, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

Subscribe

नवी दिल्ली : दहशतवादाला एखाद्या देशाकडून मिळणारे खतपाणी म्हणजे राजकीय तसेच आर्थिक मदतीचा मुख्य स्रोत आहे. काही देश स्वत:च्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून दहशतवाद्यांना मदत करतात. अशा देशांकडून त्याचा भुर्दंड वसूल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान आणि चीनचा थेट उल्लेख न करता केले

दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखण्यासंदर्भात नवी दिल्लीत आयोजित ‘नो मनी फॉर टेरर’ (एनएमएफटी) या तिसऱ्या मंत्रिस्तरीय परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. दहशतवादाच्या मुद्यावर कोणतीही संदिग्धता असू नये. दहशतवादाला मदत करणाऱ्या देशांवर भुर्दंड लावला पाहिजे. दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटना आणि व्यक्ती यांना एकटे पाडले पाहिजे. या प्रकरणी कोणताही जर तर किंवा किंतु नसावा, असेही मोदी म्हणाले.

- Advertisement -

जगाच्या आधी भारताने दहशतवादाचा क्रूर गडद चेहरा पाहिला आहे. गेली अनेक दशके दहशतवादाने विविध नावाने, स्वरुपात भारताचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. हजारो मौल्यवान जीव यात हकनाक गेले, मात्र भारताने तडफेने दहशतवादविरोधी लढा लढला आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला.

- Advertisement -

दहशतवादाचा संपूर्ण मानवतेवरच परिणाम होत असतो. पण दीर्घकालीन प्रभाव प्रामुख्याने गरीबांवर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होतो. पर्यटन असो की व्यापार, सतत दहशतीखाली असलेला प्रदेश कोणालाच आवडत नाही, अशी टिप्पणी मोदी यांनी केली. दहशतवादामुळे लोकांचा रोजगार हिसकावून घेतला जातो. आपण दहशतवादाला वित्तपुरवठा करणाऱ्यांच्या मुळावरच घाव घालणे अधिक महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आपल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण दहशतवाद्यांचा पाठपुरावा केला पाहिजे, त्यांच्या मदत साखळ्या तोडल्या पाहिजेत आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर प्रहार केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. छुप्या युद्धाबाबत सावध राहण्याची सूचना देखील त्यांनी आंतरराष्ट्रीय संघटनांना केली.

दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटना आणि व्यक्ती यांना एकटे पाडले पाहिजे. या प्रकरणी कोणताही जर तर किंवा किंतु नसावा. दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रकट आणि गुप्त शत्रूंविरोधात संपूर्ण जगाने एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे दहशतवादी कारवायांमध्ये होत असलेल्या बदलांबाबत भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, दहशतवाद्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तसेच त्यांची भर्ती करण्यासाठी नवनवीन प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते. डार्क नेट, खासगी चलन प्रकार अशासारखी आव्हाने निर्माण होत आहेत. नवीन आर्थिक व्यवहार तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी समान विचारांची गरज आहे. या प्रयत्नांमध्ये खासगी क्षेत्राला सहभागी करून घेणे फार महत्त्वाचे आहे. दहशतवाद ओळखण्यासाठी, शोधून काढण्यासाठी तसेच त्याचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानच उपयोगी पडणार असले तरीही अर्थ व्यवहारविषयक तंत्रज्ञानाबाबत सावध राहण्याची सूचना त्यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, गृह सचिव अजय कुमार भल्ला आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक दिनकर गुप्ता यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -