दिलासा! भारतात विकसित केलेल्या कोरोना लसीची AIIMS मध्ये मानवी चाचणी सुरू

१९ लाख मुलांचं रुबेलाचं लसीकरण पूर्ण

कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जगभरात विविध स्तरावर लस बनवण्याचे संशोधन सुरू आहे. भारतानेही COVAXIN लस विकसित केली असून त्यांच्या मानवी चाचणीला दिल्लीतील AIIMS हॉस्पिटलमध्ये सुरूवात झाली आहे. एका ३० वर्षीय स्वयंसेवकाला या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. इंडिया टुडेला एम्स हॉस्पिटलमधील सूत्रांकडून ही माहिती मिळाल्याचे समजते. या स्वयंसेवकाला दोन तास हॉस्पिटलमध्ये निरीक्षणासाठी ठेवण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार केली आहे. त्या स्वयंसेवकाला हॉस्पिटलमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर घरी पाठवण्यात येणार आहे. पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येणार असून नंतर पुढील प्रक्रिया पाहिली जाणार आहे. COVAXIN लसीचा हा पहिलाच डोस असून यासाठी हा ३० वर्षीय स्वयंसेवक पात्र ठरला आहे. ही लस हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीकडून तयार केली जात असून यासाठी त्यांनी आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. नुकतेच त्यांना केंद्रीय औषध नियंत्रण विभागाकडून (डीसीजीआय) मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली होती.

पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी निरोगी आणि सदृढ व्यक्तींची निवड केली जाणार आहे. यामध्ये १८ ते ५५ वयोगटातील व्यक्ती असणार असून यामध्ये गर्भवती नसणाऱ्या महिलांचाही समावेश असणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर १४ दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे.

हेही वाचा –

नागपूरमध्ये दोन दिवसाचा जनता कर्फ्यू; संघर्षानंतर महापौर-आयुक्त एकत्र