पाकिस्तानमध्ये तबलिगींचा हंगामा; हॉस्पिटलचे गेट तोडून पळण्याचा प्रयत्न

pakistani tablighi jamat
प्रातिनिधिक छायाचित्र

पाकिस्तानमध्ये देखील तबलीगी समाजाच्या लोकांमध्ये कोरोनाचे संक्रमण झालेले आहे. तिथे क्वारंटाईन केलेले तबलिगी जमातीचे सदस्य पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील काहींना पकडण्यात आले आहे. मात्र तबलिगींच्या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाहोर येथे असलेल्या एक्सपो सेंटर फिल्ड हॉस्पिटलमधून ४०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित क्वारंटाईन केले होते. यातील अनेकजण हे तबलिगी जमातीशी निगडीत आहेत.

एक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी तबलिगीच्या काही सदस्यांनी हॉस्पिटलमध्ये राहण्यास नकार दिला. बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना हॉस्पिटलमध्ये चांगलाच गजहब उडाला. एवढच काय तर काही तबलिगीच्या सदस्यांनी हॉस्पिटलचे गेटच तोडून टाकले. काही रुग्ण पळून जाण्यास यशस्वी झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना पकडले.

तबलिगी सदस्यांसोबत बाहेर जाण्यास तयार झालेल्या इतर काही सदस्यांची समजूत घालण्यास पोलीस यशस्वी झाले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. असद असलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आता हॉस्पिटलचा ताबा घेतला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

दर जमातचे सदस्य मुहम्मद शब्बीर यांनी सांगितले की, हॉस्पिटलने त्यांना बळजबरीने पकडून ठेवलेले आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून देखली त्यांना क्वारंटाईन करुन ठेवण्यात आलेले आहे. काही सदस्य बरे झालेले असताना देखील त्यांना घरी जाऊ दिले जात नाही. जर बळजबरीने त्यांना हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवले तर ते समाज आणि कुटुंबीयांसाठी ठीक होणार नाही, त्यामुळे उपचाराचे प्रोटोकॉल व्यवस्थित पाळले जावेत, अशी मागमी त्यांनी केली.