Corona in India: देशात बाधितांची संख्या ५८ लाखांवर; २४ तासांत ८६,०५२ नवे रूग्ण

सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा ५८ लाख १८ हजारांहून अधिक झाला आहे.

corona virus in india

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसतय आहे. यासह दिलासादायक म्हणजे कोरोना संसर्गातून बरे होणार्‍या लोकांची संख्या देखील वाढत आहे. परंतु, गुरुवारीच्या तुलनेत शुक्रवारी कोरोना रुग्णांच्या आकड्यात किंचित घट झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८६, ०५२ नवीन रुग्ण आढळल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५८ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे देशात एका दिवसात विक्रमी चाचण्यांचीही नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासात देशात ८६ हजारांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून १, १४१ लोकांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा ५८ लाख १८ हजारांहून अधिक झाला असून त्यापैकी ९ लाख ७० हजार ११६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत देशात ४७ लाख ५६ हजार १६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनाने आतापर्यंत ९२ हजार २०० हून अधिक जणांचा जीव गेला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशात एका दिवसात विक्रमी कोरोना चाचण्यांचीही नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या २४ तासांत देशात १३ लाखांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे. दिवसभरात १३ लाख ८० हजार चाचण्या करण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.