घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत २४ तासांत आढळले ३३४ नवे रुग्ण, ७ जणांचा मृत्यू

Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले ३३४ नवे रुग्ण, ७ जणांचा मृत्यू

Subscribe

गेल्या २४ तासांत मुंबईत ३३४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ४५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ९ हजार ६३१वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ११ हजार ३६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ लाख ९१ हजार ८२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रात आज दिवसभरात १ हजार ९२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात ४ हजार ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ३० हजार २७४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार १३९ जणांचा मृत्यू झाला असून १९ लाख ३६ हजार ३०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ४१ हजार ५८६ जणांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आज दुपारी गोरेगावच्या एका स्टुडिओला भीषण आग लागली. माहितीनुसार या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या सकाळी १० वाजता कृष्णकुंजवर पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे.


गोरेगावच्या एका स्टुडिओत भीषण आग लागल्याचे समोर येत आहे. माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


मंदार हळबेंचा भाजपात प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कल्याण-डोंबिवलीमध्ये एका मागून एक मोठे झटके बसत आहेत. गेल्या २४ तासात मनसेला दुसरा मोठा झटका बसला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ अजून एका नेत्याने मनसेला रामराम ठोकला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे आता राजकारणात एकच चर्चा रंगली असून येत्या आगामी काळात महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला खिंडार पडले आहे.

mns corporator mandar halbe joins bjp


संतापजनक! ५ महिन्यांपासून तरुणीवर १७ जणांनी केला बलात्कार

बलात्कार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच नाही तर कर्नाटकातही अशा घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशीच एक संतापजनक घटना कर्नाटकमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. एका अल्पवयीन मुलीवर १७ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक केली असून गेल्या पाच महिन्यांपासून बलात्कार केल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुख्य आरोपी पीडितीची मावशी असल्याचे उघडकीस आले आहे.


अंधेरी लिंक रोड येथे भीषण आग

गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तीन दिवसांपूर्वीच शिवडी भागातील बीपीटी रोड, पंचशील मिल गोदाम येथे लाद्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा अंधेरीत आग लागल्याची घटना घडली आहे. अंधेरी लिंक रोड येथील लक्ष्मी प्लाझा इमारतीमधील सहाव्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या रवाना झाल्या आहेत.


दिल्ली सीमेवरील खिळ्यांचा वेढा भारत-चीन सीमेवर हवा होता; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. मात्र, दिल्ली सीमांना लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे. सिमेंटच्या स्लॅबवर उलटे खिळे लावले आहेत. यावरुन संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. दिल्ली सीमेवरील खिळ्यांचा वेढा भारत-चीन सीमेवर हवा होता. भारत-चीन सीमेवर खिळे लावले असते तर चिनी सैन्य भारतात घुसलं नसतं, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.


रोज हजारो लोकांना भेटतो, गुन्हेगारांसोबत व्हायरल फोटोवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत गृहमंत्री तीन गुन्हेगारांसोबत दिसत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांचा फोटो गुन्हेगारांसोबत असल्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. फोट असणाऱ्या तीन व्यक्तींविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील एका व्यक्तीवर ५०० ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करुन विकले असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या व्यक्तीवर बलात्कार आणि अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणि तीसऱ्यावर गंभीर गुन्हे असल्याचे समजते आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दौरा करताना हजारो लोकांना भेटतो. यामध्ये कोण कुठून आला आणि कोणाचा काय व्यवसाय आहे. हे माहित नसते म्हणून असा प्रकार घडला असेल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.


अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या भव्या लाल बनल्या नासाच्या कार्यकारी प्रमुख

भारतीय वंशाच्या भव्या लाल यांनी अभिमानाचा झेंडा रोवला आहे. भव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भव्या यांचं नाव नासाच्या परिक्षण समितीवर सदस्य म्हणून निवडलं आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर आता भारतीय वंशाच्या भव्या लाल यांची नासाच्या कार्यकारी प्रमुखपदी निवड झाल्याने भारतीयांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.


…तर त्यांनी जात तरी बदलावी; नरेंद्र पाटलांचा टोपे, खोतकरांवर हल्लाबोल

आमदार नरेंद्र पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. समाजाच्या प्रश्नांवर हे मंत्री एकत्र येत नसतील तर त्यांनी आपली जात तरी बदलावी अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली आहे. सत्तेतील मंत्री विजय वडेट्टीवार हे मराठा समाजाच्या विरोधात बोलताना जालन्याचे पालकमंत्री ते निमुटपणे खपवून घेतात. मला तर आश्चर्य वाटतंय की त्यांनी सत्तेत येताच जात तर बदलली नाही ना?! असा खोचक सवाल नरेंद्र पाटील यांनी केला आहे.


सोनं तस्करीसाठी लढवली भन्नाट शक्कल, चक्क गिळल्या १६१ सोन्याच्या कॅप्सूल

सोन्याची तस्करी करण्यासाठी नेहमीच वेगवेगळी शक्कल लढवली जाते. तस्करी करण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विविध मार्गांनी सोन्याची तस्करी केली जाते. आजवर अनेक ठिकाणी सोन्याच्या तस्करीचे प्रकार उघड झाले आहेत. चेन्नईत पकडण्यात आलेल्या स्मगलर्सकडून सोन्याची तस्करी करण्याचा एक नवा प्रकार समोर आला आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी स्मगलर्सनी एक भन्नाट शक्कल लढवली. ती पाहून पोलिसही हैराण झाले. स्मगलर्सनी चक्क सोन्याच्या कॅप्शुल्स गिळल्याचा एक धक्कदायक प्रकार रविवारी चेन्नई विमानतळावर समोर आला आहे. स्मगलर्सनी चक्क १६१ सोन्याच्या कॅप्सूल्स गिळल्या होत्या. सोन्याची तस्करी करण्याचा हा वेगळा प्रकार पाहून पोलिसही हैराण झाले आहेत. या प्रकारात एकूण सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २२ जानेवारी रोजी दुबई आणि शेरजाह येथून आलेल्या काही प्रवाशांना एअर इंटेनिजेन्स युनिटला त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी त्यांना बाहेर जाताना अडवले होते असे चेन्नई कस्टमने सांगितले आहे.


धक्कादायक: पोलिओ डोस सोबत प्लॅस्टिकचे टोपणही गेले बाळाच्या पोटात

कोरोनाच्या काळात लांबणीवर पडलेली पोलिओ लसीकरण मोहिम पुन्हा एकदा सुरु झाली. संपूर्ण देशात पोलिओ लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र या लसीकरण मोहिमेतून धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. यवतमाळ येथे पोलिओ लसीकरणावेळी पोलिओ डोस समजून लहान बाळांना सॅनिटायझर पाजण्यात आले. या घटनेमुळे एकूण १२ मुलांची प्रकृती खालावली. हा प्रकार संपत नाहीतर पंढरपूर येथून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. लसीकरण करताना झालेल्या हलगर्जीपणामुळे पोलिओ डोस एका चिमुकल्याच्या जिवावर बेतला. पोलिओ डोस देताना एक वर्षांच्या बाळाच्या पोटात प्लॅस्टिकचा तुकडा गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पंढरपूरच्या भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर हा प्रकार घडला. या प्रकारात संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी महिला सामाजिक कार्यकर्त्या राजश्री ताड यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

धक्कादायक! प्रेमीयुगलांची रेल्वेखाली आत्महत्या

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग, प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात ही घटना घडली असून या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. राजू बाबा कोळपे (३८) आणि राणी राजेंद्र साबळे (३०), अशी दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून त्यांनी आत्महत्या का केली याचा सध्या शोध सुरु आहे.


स्वप्नाळू नाही तर काय?

‘केंद्रीय सरकारने आणखी एक स्वप्नाळू अर्थसंकल्प संसदेत सादर केला. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. आर्थिक क्षेत्राचा आणि विकास दराचा आलेख चढत्या दिशेने जाण्याऐवजी तो शून्याकडे आणि शून्यातून उणे म्हणजे ‘मायनस’ होत खोल खोल जात आहे. आर्थिक आघाड्यांवर असे भकास आणि उदास चित्र आहे. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेतील अर्थसंकल्पीय भाषणात मात्र लाखो कोटींची आकडेमोड करुन वारेमाप घोषणा केल्या. यासा स्वप्नाळू नाहीतर काय म्हणायचे’? २०१४मध्ये सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. याच उदारहण देणे म्हणजे विहिर पाण्याचा एक थेंबही नसताना तमाम प्रजेला कसे भरघोस पाणी देणार, विकासाची गंगा देशाच्या कानाकोपऱ्यात कशी पोहोचविणार वगैरे स्वप्नांची सैर घडवायची, अशातला हा प्रकार आहे. विहिरीतच काही नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र अर्थसंकल्पात कुठेच मिळत नाही.


पश्चिम उपनगरीय परिसरात ‘या’ भागात मंगळवार आणि बुधवारी पाणी पुरवठा बंद

पश्चिम उपनगरिय भागात पुढील दोन पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. अंधेरी, खार ,सांताक्रूझ आणि विलेपार्ले येथील पाणीपुरवठा येत्या मंगळवारी आणि बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. अंधेरी भागातील दोन मुख्य जलवाहिन्याना जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. अंधेरी पूर्वेकडील एन.एस.फडके रिजन्सीनजीक महापालिकेच्या मुख्य जलवाहिनी १ हजार ३५० मिलीमीटर व्यासाची वांद्रे ऑउटलेट जलवाहिनी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पार्ले येथील १२हजार मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरीय भागातील काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.


ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चिकू पठाणला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


एनसीबीची माहिम परिसरात कारवाई

मुंबईच्या माहिम परिसरात काल रात्री एनसीबीने कारवाई केली. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) केलेल्या कारवाईत एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


शहीद सागर धनगर या जवानाचं पार्थिव मूळ गावी येणार

वीरगती प्राप्त शहीद सागर धनगर या जवानाचं पार्थिव आज मूळ गावी येणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. चाळीसगाव तालुक्यातील तांबोळा येथे सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे


कोरोनापेक्षाही अधिक धोकादायक आहे ‘बुरशी’ रोग

आतापर्यंत जगातील लोक कोरोना विषाणूमुळे त्रस्त झाले होते. मात्र, आता कोरोना विषाणूपेक्षाही अधिक धोकादायक रोगाने जगात एन्ट्री केली आहे. या रोगामुळे सगळेच चिंतेत आले आहेत. हा रोग फार भयंकर असून याचा फैलाव अधिक वेगाने होत असल्याची भिती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. हा एक बुरशी रोग असून ‘कँडिला ऑरिसा’ असं या रोगाचे नाव आहे. हा रोग काळ्या प्लेगमुळे पसरत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा रोग अत्यंत धोकादायक मानला जाणारा रोग आहे. तसेच या रोगाचा फैलाव देखील अधिक वेगाने होतो.


‘या’ कारणाने प्रीति झिंटाने सोडले बॉलिवूड

बॉलिवूडची डिंपल क्वीन म्हणून प्रचलित असलेल्या प्रीति झिंटाने बॉलिवूड किंग शाहरुख खानसोबत ‘दिल से’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात प्रीति झिंटची भूमिका छोटी होती. परंतु या छोट्याशा भूमिकेत तिने चाहत्यांचे मन जिंकले होते. ‘माय दिल गोज हम्म्म’ ते पिया पिया पर्यंत गाण्यांमधून तिने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली होती. प्रीति झिंटा बड्या अभिनेत्र्यांपैकी एक होती. परंतु आता तिला मोठ्या पडद्यावर पाहून बराच काळ उलटला आहे. प्रीति झिंटा स्वतःला का मोठ्या पडद्यापासून का दूर गेली याचे कारण आता प्रीति झिंटाने दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रीति झिंटा बॉलिवू़डपासून दुर आहे. यावर प्रीतीने म्हटले आहे की, मी स्वतःची विक्री करत नाही. यामुळेच सिनेसृष्टीतून स्वतःच दूर झाली आहे. असे एका मुलाखतीत प्रीति झिंटाने म्हटले आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -