Corona Vaccine : सीरम इन्स्टिट्युटची कोरोना लसीबाबत मोठी घोषणा!

Covishield Vaccine SII

कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असताना सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे ती कोरोनाची लस कधी येणार याची. त्यासाठी जगभरातल्या जवळपास ८० संस्था कोरोनाच्या लसीवर काम करत आहेत. त्यापैकी रशियाने आपली लस देण्याची प्रक्रिया सुरू देखील केली असली तरी त्यावर WHO आणि जगभरातल्या इतर देशातल्या संस्था आणि खुद्द अमेरिकेने देखील आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे रशियाच्या लसीविषयी संशयाचं वातावरण असताना अमेरिकेत तयार होणारी Moderna लस आणि ऑक्स्फर्डसोबत सिरम इन्स्टिट्युटतर्फे संशोधन सुरू असलेली Covishield लस यांचे आत्तापर्यंतच्या टप्प्यांचे निष्कर्ष सकारात्मक राहिले आहेत. या दोन लसींकडून जगाला मोठी आशा असताना आता Oxford सोबत संशोधन सुरू असलेल्या Serum Institute of India अर्थात SII ने कोविशिल्ड लसीबाबत मोठी घोषणा केली आहे. ही लस Phase 3 मध्ये पोहोचली असून त्या टप्प्यात चाचण्या सुरू असल्याचं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे.

‘लस येईल तेव्हा जाहीर करूच, गैरसमज नको’!

दरम्यान, या घोषणेसोबतच कंपनीकडून एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिरमकडून तयार केली जाणारी लस येत्या ७३ दिवसांमध्ये बाजारात येणार असल्याचं वृत्त पसरवलं जात होतं. मात्र, हे वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याचं SII कडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘७३ दिवसांमध्ये कोविशिल्ड बाजारात येणार असल्याचं सांगणारं वृत्त गैरसमज पसरवणारं असून अजूनही तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या सुरू आहेत. जेव्हा केव्हा लस बाजारात येईल, तेव्हा आम्हीच ते जाहीर करू’, असं सिरमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून हे ट्वीट करण्यात आलं असून त्यासोबत कंपनीचं स्टेटमेंट देखील जोडण्यात आलं आहे.

व्हॅक्सिनच्या स्वस्त उपलब्धतेसाठी करार

याआधीच सिरम आणि ऑक्सफोर्डसोबत बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनने मोठा करार केला असून यानुसार व्हॅक्सिनचे १० कोटी डोस भारत आणि इतर गरीब देशांमध्ये पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, या लसीची किंमत फक्त २२५ रुपये इतकी असेल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. यासाठी गेट्स फाऊंडेशनने ऑक्सफोर्डसोबत लसीवर संशोधन करणाऱ्या AstraZeneca ला १५ कोटी डॉलरचा निधी दिला आहे.