नवी दिल्ली : देशभरात गेल्या काही काळात फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली. अशामध्ये लखनऊमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका महिलेने आयएएस अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे सांगत महिलांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. पण या प्रकरणाची आता देशभर चर्चा रंगली आहे. (Crime cheating of crores by posing as wife of ias name of kitty party)
हेही वाचा : Delhi Assembly Election : महाराष्ट्रानंतर दिल्लीची बारी, विधानसभा निवडणुकीसाठी आपची पहिली यादी जाहीर
लखनऊमध्ये एका महिलेने आयएएस अधिकाऱ्याची पत्नी असल्याची बतावणी केली. तिने काही महिलांसोबत एक किटी पार्टी ग्रुप तयार केला. याच महिलांकडून तिने तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 24 मार्चला फसवणूक करणाऱ्या आरोपी महिला रश्मी सिंह हिने स्वतः चार महिलांविरोधात पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्या 4 महिलांनी रश्मी सिंह हिच्या घरातून कोरा धनादेश चोरला असून त्याचा गैरवापर होत असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी जेव्हा या महिलांना बोलावले, तेव्हा भलतीच गोष्ट समोर आली. घरातून ब्लँक चेक चोरीला गेल्याचे आरोपी महिला रश्मी सिंह सिद्ध करू शकली नाही. त्यानंतर त्या 4 महिलांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आणि रश्मी सिंह विरोधात एफआयआर दाखल केला.
4 महिलांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेत सांगितले की, त्या 13 वर्षांपूर्वी रश्मीला एका मैत्रिणीमार्फत पार्टीत भेटल्या होत्या. यानंतर त्यांच्यामध्ये पैशांचा व्यवहार सुरू झाला. या बहाण्याने रश्मीने 18 लाख रुपये घेतले, तिच्यावर दबाव टाकल्यावर तिने 5 लाख रुपये परत केले. त्यानंतर 13 लाख रुपये मागितले असता तिने या महिलांनाच अडकवण्याची धमकी दिली. लखनऊची रहिवासी असलेल्या रश्मी सिंहचे इंदिरा नगरच्या बाल विहार कॉलनीत एक मोठे घर आहे. यामध्ये चारही बाजूंला तिने सीसीटीव्ही बसवले आहेत. चार ते पाच आलिशान गाड्या आहेत. तसेच समाज माध्यमांचाही ती चांगला वापर करते. ती आपल्या लाईफस्टाईलने लोकांमध्ये आपली छाप पाडते आणि व्यावसायिकांच्या पत्नींना टार्गेट करून ती आपल्या जाळ्यात अडकवते. हळूहळू ती महिलांशी मैत्री करते आणि त्यांच्या घरी किटी पार्टी करते. चांगल्या नफ्याचे आमिष दाखवत, तिने 10 महिलांकडून तब्बल 1.5 कोटी रुपये उकळल्याचे समोर आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Edited by Abhijeet Jadhav