‘निवार’नंतर पुन्हा तामिळनाडूवर चक्रीवादळाच्या संकटाचं सावट!

केरळ, कन्याकुमारी, तामिळनाडू आणि अलाप्पुझामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)चे पथके तैनात करण्यात आली आहेत.

cyclone burevi likely to hit south tamil nadu on december 4

‘निवार’ चक्रीवादळानंतर केरळ आणि तामिळनाडूनवर अजून एका चक्रीवादळाचं संकट ओढावलं आहे. या चक्रीवादळाचं नाव ‘बुरेवी’ (Cyclone Storm Burevi) असं आहे. बंगालच्या उपसागरात तीव्र दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, ते चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. येत्या ४ डिसेंबरपर्यंत हे चक्रीवादळ दक्षिण तमिळनाडूला धडकणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज संध्याकाळी किंवा रात्री श्रीलंकेच्या किनारी भागातून जाणार आहे. त्यानंतर ३ डिसेंबरला पश्चिमेकडील मुन्नार आणि कन्याकुमारी येथील आखातीपर्यंत पोहोचणार आहे. तसेच आज केरळमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. माहितीनुसार गेल्या आठवड्यात ‘निवार’ चक्रीवादळामुळे तामिळनाडूत खूप नुकसान झाले होते. या चक्रीवादळाची झळ सोसत असतानाच आता तमिळनाडूनवर दुसऱ्या चक्रीवादळाच्या संकटाचं सावट आलं आहे.

त्यामुळे ‘बुरेवी’ चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील पंबर पुलावर चक्रीवादळाचा इशारा देणारा पिंजरा बसविण्यात आला आहे. यासह केरळ, कन्याकुमारी, तामिळनाडू आणि अलाप्पुझामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)चे पथके तैनात करण्यात आली आहेत. आयएमडीने मच्छीमारांना सुमद्रात जाऊ नये, असे आवाहन केलं आहे. १ डिसेंबरपासून ते ४ डिसेंबरपर्यंत मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे.

केरळच्या हवामान केंद्राचे संचालक के.संतोष यांनी सांगितलं की, आज संध्याकाळी किंवा रात्री ‘बुरेवी’ चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनारपट्टी ओलांडेल. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी जोरदार मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण-उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, दक्षिण-उत्तर केरळ, दक्षिण किनारी आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीप अशा काही भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे.


हेही वाचा – सर्व देशवासीयांना लस देऊ असं सरकारने कधीही म्हटलं नाही – आरोग्य सचिव