Cyclone Gulab : गुलाब चक्रीवादळ आंध्र प्रदेशसह ओडिशा किनारपट्टीवर धडकणार, रेड अलर्ट जारी

बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला शनिवारी दुपारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले असून आज, रविवारी संध्याकाळपर्यंत ते आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ९५ किमी तासी वेगाने किनारपट्टीकडे सरकत असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या दोन राज्यातील किनारपट्टी क्षेत्रावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर चिंताजनक म्हणजे महाराष्ट्रातही याचा पिरणाम जाणवू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

असे सांगितले जात आहे, बंगालच्या उपनगरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, ते तीव्रता होऊन आता चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. आज ते ओरिसा किनारपट्टीवर आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण बघायला मिळेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सोमवारी २७ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशाच्या आणि आंध्रच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होणार असल्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे काही प्रमाणात पूराची शक्यता असल्याचे तसेच इतर प्रकराच्या नुकसानीचाही इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

या चक्रीवादळाचे ‘गुलाब’ नाव हे पाकिस्तानने सुचवलं आहे. विशाखापट्टनम आणि गोपालपूर या दरम्यान असलेल्या कलिंगपट्टनम या ठिकाणी संध्याकाळपर्यंत गुलाब चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मच्छिमारांना आज न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंगालच्या उपसागरात तौक्ते आणि यास या चक्रीवादळानंतर या वर्षी निर्माण होणारं गुलाब हे तिसरं चक्रीवादळ आहे.


अफगाणिस्तानआडून दहशतवाद नको