CycloneAmphan: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगाल-ओडिशाचा हवाई दौरा करणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अम्फान वादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याला भेट द्यावी असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालला भेट देणार आहेत.

narendra modi and mamta banarjee

पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि ओडिशाचा दौरा करणार आहेत. अम्फान वादळामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील भागात होणाऱ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी बंगाल आणि ओडिशा राज्यांना भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी १०.३० वाजता कोलकाता विमानतळावर दाखल होतील. यानंतर पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी कोलकातासह उत्तर आणि दक्षिण २४ परगणा बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण करतील. पंतप्रधान मोदी हे तब्बल ८३ दिवसानंतर दिल्लीच्या बाहेर पडणार आहेत.

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींना राज्यातला भेट द्यावी, असं आवाहन केलं होतं. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं आवाहन स्वीकारून पंतप्रधान मोदी बंगालच्या दौर्‍यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घएणार आहेत.

पंतप्रधानांचं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: अम्फान बाधित राज्यांवर लक्ष ठेवून आहेत. अम्फानमुळे पश्चिम बंगालमधील विध्वंसांची चित्रे मी पाहात आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे. ही एक अतिशय कठीण वेळ आहे, यावेळी संपूर्ण देश पश्चिम बंगालच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. आम्ही राज्यातील जनतेच्या भल्यासाठी प्रार्थना करत आहोत. परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


हेही वाचा – छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची ‘न्याय योजना’ सुरू, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ७५०० रुपये


मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं होतं आवाहन

अम्फानच्या वादळाने पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक विनाश केला आहे. राज्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दावा केला आहे की, अम्फानमुळे राज्यात ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्य भेटीची मागणी केली होती. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राज्यातील परिस्थिती चांगली नाही. पंतप्रधान मोदींनी येथे भेट द्यावी अशी माझी मागणी आहे. मी हवाई सर्वेक्षण देखील करेन. पण परिस्थिती पूर्ववत होण्याची मी वाट पाहत आहे.