घरताज्या घडामोडीSohail Kaskar : सोहेल कासकर सर्च ऑपरेशनमध्ये अमेरिकेने वापरला होता दहशतवादी, शस्त्रास्त्रही...

Sohail Kaskar : सोहेल कासकर सर्च ऑपरेशनमध्ये अमेरिकेने वापरला होता दहशतवादी, शस्त्रास्त्रही खरेदी केली

Subscribe

अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात आणण्यात भारतीय तपास यंत्रणांना पुन्हा एकदा अपयश आले. सोहेल कासकरला अमेरिकन तपास यंत्रणांनी नार्को टेररिजम (Narco Terrorism) प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलीसांनी या प्रकरणात सातत्याने प्रयत्न केले होते. परंतु मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार सोहेल कासकरने पाकिस्तान गाठल्याची माहिती आहे. याआधी अमेरिकन यंत्रणेने राबवलेल्या सर्च ऑपरेशनची अतिशय रंजक अशी मोहिम आहे. या मोहिमेत एका दहशतवाद्याचा वापर करत संपूर्ण प्रकरणाची पोलखोल अमेरिकन यंत्रणेने केली होती. (dawood ibrahim nephew fled away from america to Pakistan via Dubai slipped away from Mumbai police)

मुंबई पोलिसांच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह

नुकतीच मुंबई पोलिसांच्या टीमने सोहेलचा संवाद इंटरसेप्शनच्या माध्यमातून प्राप्त केला होता. या प्रकरणात अमेरिकन एजन्सीसोबत संपर्क साधल्यावर माहिती मिळाली की सोहेल कासकर दुबईमार्गे पाकिस्तानात पोहचला आहे. आता या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलीस आणि अमेरिकन तपास यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे बोलले जात आहे. याच प्रकरणात आता मुंबई पोलिसांच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

- Advertisement -

याआधी सोहेलसोबत अटक करण्यात आलेल्या दानिश अलीला भारतात आणण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले होते. त्यापाठोपाठच अमेरिकन तपास यंत्रणाकडून सोहेलला भारतात आणण्यासाठी मुंबई पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. पण अमेरिकेने सोहेल कासकरला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन का केले नाही ? ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही. भारताकडे सोपावण्याएवजी अमेरिकेने सोहेलला मुक्त करत जाऊ दिले.

कोण आहे अली दानिश ?

सूत्रांच्या माहितीनुसार दानिश अलीचे वडिल हे दिल्लीच्या जामा मस्जिद येथे काम करतात. त्याच्या दोन भावांपैकी एक भाऊ हा डॉक्टर असून तो रशियात प्रॅक्टिस करतो. तर दुसरा भाऊ हा सर्वोच्च न्यायालयात जेष्ठ वकील आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार २००१ मध्ये दानिश दुबईला गेला होता. त्य़ाठिकाणी दानिशची भेट ही सोहेल कासकरसोबत झाली. दोघेही दोन वर्षे एकत्र राहिले. त्यानंतर सोहेलने दानिशला स्मगलिंगच्या कामाबाबत माहिती दिली. हिऱ्यांच्या खाणी असलेल्या रशियात जाण्याचा प्लॅन तिथेच ठरला.

- Advertisement -

अनेक प्रयत्नानंतरही दानिशला रशियाचा व्हिसा मिळत नव्हता. त्यानंतर दानिशने २००३-०४ मध्ये अभ्यासासाठी रशियाचा स्टुडंट व्हिसा घेतला. दोन वर्षे अभ्यास करून दानिशने हिऱ्यांच्या दुनियेत पाऊल ठेवले. त्यादरम्यानच सोहेलला दक्षिण आफ्रिकेत हिऱ्यांच्या स्मगलिंग दरम्यान अटक झाली. हिऱ्यांच्या स्मगलिंगच्या आरोपात दानिश एक वर्षे जेलमध्ये होता. जेलमधून सुटका झाल्यानंतर सोहेल आणि दानिश हत्यारांचे स्मगलिंग करू लागले.

अन् अमेरिकेन एजन्सीच्या रडारवर आले

सोहेल कासकर आणि दानिश त्यानंतर स्पेनला निघून गेले. त्याठिकाणी पहिल्यांदाच ते अमेरिकन एजन्सिच्या रडारवर आले. अमेरिकन आणि स्पॅनिश पोलिसांना एक प्लॉट तयार केला. ज्यामुळेच यांच्या कामाची पद्धत अधिक सखोलपणे समजता येईल, अशी रणनिती दोन्ही पोलीस यंत्रणांनी आखली. त्यामध्ये एजन्सीचा एक अधिकारीच दहशतवादी झाला आणि सोहेल तसेच दानिशच्या संपर्कात आला.

अमेरिकेने पेरला बोगस दहशतवादी

त्या बोगस दहशतवाद्याने स्वतःला रिव्होल्यूशनरी आर्म फोर्स कोलंबियासोबत जोडला असल्याचा दावा केला. त्या दहशतवाद्याने विश्वास दिला की, तो कोलंबियन सरकारविरोधात आहे. त्यासाठीच शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकन तपास यंत्रणांनी एका मिटिंगच्या माध्यमातून स्टिंग ऑपरेशन केले. त्यामध्ये या दोघांनाही अटक करण्यासाठीचे पुरावे जमा करण्यात आले. अमेरिकन तपास यंत्रणेने या ऑपरेशनमध्ये त्यांना पैसेही दिले. त्यानंतर २०१४ मध्ये अमेरिकन तपास यंत्रणांनी सोहेल आणि दानिशला ड्रग्ज आणि एअर मिसाइलच्या डिलिंगच्या प्रकरणात अटक केली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण तपासासाठी फेडरल ब्युरो ऑफ इनवेस्टिगेशनला सोपावण्यात आले. सोहेल हा दाऊद इब्राहिमचा भाऊ नुरा कासकरचा मुलगा आहे. नूरा कासकरचा मृत्यू २०१० मध्ये पाकिस्तानात किडनी फेल झाल्याने झाला होता.

सोहेलसोबतच दानिशलाही अटक

सोहेलला जेव्हा अटक झाली तेव्हा त्याच्यासोबत हामिद चिस्ती उर्फ बेनी, वाहब चिस्ती आणि दानिश होता. यांनाही त्याचवेळी अटक करण्यात आली. १२ सप्टेंबर २०१८ मध्ये कासकरला अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने शिक्षा सुनावली. त्यानंतर भारतात पाठवण्याची तयारी सुरू झाली. कारण अटक झाली तेव्हाच कासकरकडे भारतीय पासपोर्ट आढळला होता. भारत आणि अमेरिकेत २००५ साली झालेल्या करारान्वये म्युच्युअल लीगल असिस्टंट करारावर स्वाक्षरी झाली होती. त्याच आधारावर सोहेलला भारतात आणले जाणार होते. कासकरची कस्टडी मिळाली असती तर दाऊदच्या वास्तव्याबाबतची अधिक माहिती भारताला मिळणे शक्य झाले असते.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -