Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश डिसेंबर 2022 ठरला गेल्या 122 वर्षांतील सर्वात उष्ण; किमान आणि सरासरी तापमानातही...

डिसेंबर 2022 ठरला गेल्या 122 वर्षांतील सर्वात उष्ण; किमान आणि सरासरी तापमानातही वाढ

Subscribe

नवी दिल्ली : भारतात डिसेंबर 2022 हा गेल्या 122 वर्षांतील सर्वात उष्ण डिसेंबर महिना ठरला आहे. या महिन्यात देशातील सर्वोच्च तापमानाबरोबरच किमान आणि सरासरी तापमानातही प्रचंड वाढ नोंदवण्यात आली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये उष्णतेत अशी वाढ होणे ही नियमित बाब नाही आणि त्यामुळे हवामानातील अशा बदलांचा कल चिंतेचा विषय ठरू शकतो.

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये सरासरी कमाल तापमान 27.32 अंश सेल्सिअस होते. तर, सरासरी किमान तापमान 15.65 अंश सेल्सिअस होते आणि संपूर्ण महिन्याचे सरासरी तापमान 21.49 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा खूप जास्त आहे. हवामान खात्याकडील नोंदीनुसार, या कालावधीत सरासरी कमाल तापमान 26.53 अंशांवर, किमान 14.44 अंशांवर आणि महिन्याचे सरासरी तापमान 20.49 अंशांवर स्थिरावले होते.

- Advertisement -

पूर्व, ईशान्य आणि मध्य भारतात डिसेंबरमध्ये कमालीचे उच्च तापमान नोंदवले गेले. पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये, सरासरी कमाल तापमान 122 वर्षांतील आतापर्यंतचे सर्वाधिक 25.85 अंश सेल्सिअस होते. सरासरी किमान तापमान 2008 (12.70 अंश सेल्सियस) आणि 1958 (12.47 अंश सेल्सियस) नंतर तिसरे सर्वोच्च (12.37 अंश सेल्सियस) होते. म्हणजेच डिसेंबरमध्ये सरासरी कमाल तापमान सामान्यपेक्षा 0.79 अंश सेल्सिअस, किमान तापमान 1.21 अंश सेल्सिअस आणि सरासरी तापमान 1.00 अंश सेल्सिअसने जास्त होते. संपूर्ण भारतात डिसेंबरमधील सरासरी कमाल तापमान 2016 नंतर सर्वाधिक होते, असे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

- Advertisement -

डिसेंबरमध्ये देशभरात 13.6 मिमी पाऊस पडला. वायव्य भारतात 83 टक्के पावसाची घट नोंदवली गेली. मध्य भारतात 77 टक्के तर पूर्व आणि ईशान्य भारतात 53 टक्के कमी पाऊस झाला. याउलट भारतीय द्वीपकल्पात 79 टक्के जास्त पावसाची नोंद झाली.

जलवायू परिवर्तनामुळे डिसेंबरमध्ये तापमानात अशा प्रकारची वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे आगामी काळात मोठी समस्या निर्माण होऊ शकते, असे हवामान तज्ज्ञ आणि अभ्यासकांचे मत आहे.

हेही वाचा – ‘धर्मवीर’वरून पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका; शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीतच दोन गट!

- Advertisment -