Deep Sidhu in Farmers Protest : आंदोलन भडकावण्याचा आरोप असणारा दीप सिधू नक्की कोण?

Deep Sidhu arrested accused in violent agitation in Tractor rally
ट्रॅक्टर मोर्चातील हिंसक आंदोलनातील आरोपी दीप सिद्धूला अटक

राजधानी दिल्लीमध्ये ऐन २६ जानेवारीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठा गोंधळ झाला. यावेळी काही आंदोलक थेट लाल किल्ल्यावर चढून गेले. तिथे तिरंग्याच्या शेजारी आंदोलकांनी निशाणी साहिब ध्वज फडाकावला. यावेळी पोलिसांना धक्काबुक्की झाल्याचे देखील प्रकार घडले. यामध्ये तब्बल ३०० पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मात्र, या सगळ्यामध्ये आता दीप सिधू (Deep Sidhu) या गायक कलाकाराचं नाव समोर येत आहे. शेतकरी आंदोलकांच्या नेत्यांनी दीप सिधूवर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रकरणानंतर दीप सिधू नक्की कोण आहे? हे जाणून घ्यायला नेटिझन्सनी सुरुवात केली आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत, किसान स्वराज्य संघटनेचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी आंदोलकांना भडकावण्यासाठी दीप सिधू, लक्धा सिधाणा कारणीभूत ठरल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी नेटिझन्सनी दीप सिधूची कुंडलीच शोधून काढली आहे.

अभिनेता सनी देओलच्या प्रचारात…

दीप सिधू हा पेशानं गायक कलाकार आहे. कायद्याचं शिक्षण घेऊन देखील त्यानं सिनेविश्वात आपलं करिअर सुरू केलं. २०१५मध्ये रमता जोगी हा त्याचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर जोरा दास नम्ब्रिया या सिनेमात त्यानं साकारलेल्या गँगस्टरच्या भूमिकेला देखील विशेष लोकप्रियता मिळाली. तिथून दीप सिधूच्या करिअरला वेग मिळाला. त्याच्या याच लोकप्रियतेमुळेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या अभिनेता सनी देओलने त्याला आपल्या प्रचारात देखील सहभागी करून घेतलं होतं.

deep sidhu with pm narendra modi

दरम्यान, दीप सिधूचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सनी देओल यांच्यासोबतचे फोटो नेटिझन्सकडून व्हायरल केले जात आहेत. या फोटोंमुळे आणि सनी देओलच्या प्रचारामुळे दीप सिधूचं भाजप कनेक्शन स्पष्ट होत असल्याचा दावा केला जात आहे.

नोव्हेंबर महिन्यापासूनच दीप सिधू शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये (Delhi Farmers Protest) सहभागी झाला होता. सुरुवातीला त्याच्या या प्रतिमेमुळे आंदोलकांनी त्याला विरोध देखील केला होता. मात्र, नंतर दीप सिधू आंदोलकांसोबत घोषणाबाजी आणि निदर्शनं करू लागला.

शेतकरी नेते म्हणतात, हा तर…

दरम्यान, २५ जानेवारीला रात्री दीप सिधूनं आंदोलकांना भडकावल्याचा दावा किसान स्वराज्य संघटनेचे योगेंद्र यादव यांनी केला आहे. तसेच, २६ जानेवारीला झालेल्या आंदोलनामध्ये दीप सिधूचा आंदोलकांना उद्देशून बोलतानाचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता सर्व टीकाकारांचा रोख दीप सिधूच्या दिशेनं वळला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर दीप सिधूनं आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘लोकशाहीने दिलेल्या अधिकारांनुसारच आंदोलकांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला आहे. तसेच, भारताचा तिरंगा काढण्यात आलेला नाही. शिवाय, आंदोलनामुळे लोकांचा रोष वाढून झालेल्या कृतीसाठी कुणा एका व्यक्तीला दोषी ठरवता येणार नाही’, अशी भूमिका दीप सिधूनं मांडली आहे. तर दुसरीकडे अभिनेता सनी देओलने दीप सिधूशी आपला किंवा आपल्या कुटुंबाचा काहीही संबंध नसल्याचं ट्वीटरवरून स्पष्ट केलं आहे.