आयएनएस सुरत, आयएनएस उदयगिरीचे जलावतरण, भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढणार

स्वदेशी युद्धनौका बांधण्याच्या क्षेत्रात मुंबईतील माझगाव डॉक यार्डमध्ये हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. याचे कारण म्हणजे दोन युद्धनौकांच्या जलावतरणाचा एकत्रित सोहळा प्रथमच झाला आहे. माझगाव गोदीमध्ये बांधणी केलेल्या विनाशिका आणि फ्रिगेट प्रकारातील या दोन युद्धनौका आहेत. 

ब्लू वॉटर नेव्ही म्हणून ओळख असलेल्या भारतीय नौदलाचे सामर्थ्य आता आणखी वाढणार आहे. आयएनएस सुरत आणि आयएनएस उदयगिरी या युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ठ झाल्या आहेत. संपूर्ण भारतीय बनावटीच्या असलेल्या आयएनएस सुरत आणि आयएनएस उदयगिरीचे जलावतरण मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात आले.

स्वदेशी युद्धनौका बांधण्याच्या क्षेत्रात मुंबईतील माझगाव डॉक यार्डमध्ये हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. याचे कारण म्हणजे दोन युद्धनौकांच्या जलावतरणाचा एकत्रित सोहळा प्रथमच झाला आहे. माझगाव गोदीमध्ये बांधणी केलेल्या विनाशिका आणि फ्रिगेट प्रकारातील या दोन युद्धनौका आहेत.  दोन्ही युद्धनौकांची रचना नौदलाच्या नेव्हल डिझाईन संचालनालयाने केली आहे. दोन्ही युद्धनौका माझगाव डॉकमध्ये काही मिनिटांच्या अंतराने विशिष्ट पद्धतीने पाण्यात उतरवल्या गेल्या.

 जलावतरणानंतर विनाशिका प्रकारातील सूरत युद्धनौकेवर विविध उपकरणे, युद्धसामुग्री बसवली जाईल. त्यामुळे सखोल समुद्रात सूरत युद्धनौकेच्या विविध चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर २०२ ५पर्यंत ती नौदलात दाखल होईल. सूरत युद्धनौका तब्बल ७४०० टन वजनाची असून ती ब्रह्मोससारख्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असणार आहे. जगातील एक अत्याधुनिक आणि शक्तिशाली युद्धनौका म्हणून ती ओळखली जाईल. आयएनएस सूरतचे नाव गुजरातची व्यावसायिक राजधानी असलेल्या सूरतच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. मुंबईनंतर सूरत हे पश्चिम भारतातील दुसरे मोठे व्यावसायिक केंद्र मानले जाते. 16 व्या शतकापासून 18 व्या शतकापर्यंत सूरत हे जहाज बांधणीत अग्रगण्य शहर मानले जात असे. येथे बांधलेली जहाजे 100-100 वर्षे समुद्रात काम करीत असत.

आयएनएस उदयगिरीचे नाव आंध्र प्रदेशातील एका पर्वतराजीवरून ठेवण्यात आले आहे. ही युद्धनौका नौदलाच्या प्रोजेक्ट 17 ए फ्रिगेट प्रकल्पांतर्गत बांधली आहे. पाणबुडीविरोधी कारवाईची मुख्य जबाबदारी या वर्गातील युद्धनौकांवर असणार आहे. या प्रकल्पांतर्गत देशातच एकूण 7 फ्रिगेट्स बांधण्यात येणार होत्या. यापैकी चार माझगाव गोदीत, तर तीन कोलकाता येथील गोदीत बांधल्या जात आहेत. जलावतरण झाल्यावर उदयगिरीवर विविध उपकरणे बसवली जाणार आहेत. त्यानंतर समुद्रात उदयगिरीची कार्यक्षमता तपासून २०२४च्या सुरुवातीला ती नौदलात दाखल होईल.