ऑनलाईन खरेदी पडली महाग, १५ हजाराच्या कुत्र्यासाठी महिलेला ६६ लाखाचा गंडा

प्रातिनिधीक फोटो

सध्या दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी म्हणजेच सायबर फसवणूकीचे प्रकार समोर येत आहे. कित्येक फसवणूकीचे कित्येक प्रकार घडूनही लोक जागरूक होण्यास तयार नाहीत. कोणतीही चौकशी न करता ते त्यांची कमाई केलेली रक्कम सायबर गुन्हेगारांना देताना दिसतात. अशीच एक घटना उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये समोर आली आहे. या ठिकाणी एका महिलेने आपल्या मुलीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी कुत्र्याचं पिल्लू भेट देण्याचे ठरवले आणि या इच्छेपोटी ६६ लाख रुपये गमावले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेने जस्ट डायलच्या मदतीने या कुत्र्याच्या पिल्लाला ऑनलाईन ऑर्डर केले होते, परंतु जस्ट डायलवर कुत्रा देणारी व्यक्ती म्हणून तिला ज्याचा फोन नंबर सापडला तो एक सायबर गुंड निघाला.

सायबर क्राइम पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोथरोवाला येथे राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मुलीचा वाढदिवस २२ जून रोजी असल्याचे सांगितले. मुलीने आसामला तिच्या वाढदिवशी गोल्डन रिट्रीव्हर जातीचे कुत्रा घेण्यास सांगितले. यासाठी महिलेने स्थानिक जस्ट डायलची मदत घेतली. या माध्यमातून त्यांनी एका व्यक्तीशी फोनवर चर्चा केली. गोल्डन रिट्रीव्हर जातीच्या कुत्र्याची किंमत त्यांनी १५ हजार रुपये सांगितली. ऑनलाइन डिलिव्हरीसाठी त्याने पाच हजार रुपये एडव्हान्स मागितले व उर्वरित १० हजार रुपये डिलिव्हरी देण्यास सांगितले. यावर महिलेने तिच्या बँक खात्यातून पाच हजार रुपये ऑनलाईन पाठविले.

यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा फोन करून कुत्र्याच्या पिल्लूला क्वारंटाइन ठेवण्यास आणि परवाण्याच्या नावाखाली महिलेकडे तिच्या खात्यात एक लाख रुपये मागितले. २६ जून रोजी त्याने पुन्हा फोन केला आणि पिल्लाला पाठविण्याकरिता शिपिंग चार्ज म्हणून एक लाख रुपये मागितले. ही रक्कम नंतर परत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर, सुरक्षा शुल्क, शिपिंग टॅक्स आणि इतर वस्तूंवर खर्च करण्याच्या बहाण्याने २ जुलै पर्यंत त्याने महिलेकडून त्याच्या खात्यात ६६ लाख ३९ हजार ६०० रुपये जमा करून घेतले. यानंतरही तो पैशांची विचारणा करीत होता, पण फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. विशेष टास्क फोर्सचे एसएसपी अजय सिंह यांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.