Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशNew Delhi Stampede : दिल्ली स्थानकावरील चेंगराचेंगरीचे व्हिडीओ डिलीट करा, रेल्वे मंत्रालयाचे X ला पत्र

New Delhi Stampede : दिल्ली स्थानकावरील चेंगराचेंगरीचे व्हिडीओ डिलीट करा, रेल्वे मंत्रालयाचे X ला पत्र

Subscribe

रेल्वे मंत्रालयाने X ला तब्बल 250 व्हिडीओ 36 तासांमध्ये डिलीट करण्यास सांगितले आहे. याकरिता X ला रेल्वे मंत्रालयाकडून पत्र पाठविण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी देशभरातून नागरिक पोहोचत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच मागील आठवड्यात 15 फेब्रुवारीला दिल्ली रेल्वे स्थानकात रात्री चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. या घटनेचे अनेक व्हिडीओ X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले. त्यामुळे आता हे व्हिडीओ पुढील 36 तासांमध्ये X वरून डिलीट करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र रेल्वे मंत्रालयाकडून पाठविण्यात आले आहे. (Delete video of stampede at Delhi railway station, Railway Ministry letter to X)

रेल्वे मंत्रालयाने X ला तब्बल 250 व्हिडीओ 36 तासांमध्ये डिलीट करण्यास सांगितले आहे. याकरिता X ला लिहिलेल्या पत्रामध्ये रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, X ने दिल्लीत रेल्वे स्थानकावर 15 फेब्रुवारीला झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेशी संबंधित व्हिडीओ आणि फोटो आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकावे. मंत्रालयाकडून हे व्हिडीओ काढून टाकण्यामागे नैतिक निकषांचा उल्लेख केला आहे. तसेच, या पत्राच्या माध्यमातून नैतिक नियम आणि आयटी धोरणाचाही दाखला देण्यात आला आहे. काही व्हिडीओंमध्ये मृतदेह आणि बेशुद्ध प्रवासी दिसत आहेत. त्यामुळे पुढील 36 तासांमध्ये 250 व्हिडीओ काढावे, अशी मागणी रेल्वे मंत्रालयाकडून X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, रेल्वे मंत्रालयाने या व्हिडीओचे आणि अन्य काही लिंक सुद्धा X ला पाठवले आहेत.

दिल्ली रेल्वे स्थानकावर काय घडले होते?

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवार, 15 फेब्रुवारी रोजी चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी महाकुंभला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी दिल्ली रेल्वे स्थानकावर झाली होती. यावेळी विशेष गाड्यांना उशीर झाल्याने आणि फलाट बदलण्याच्या घोषणेमुळे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले होते. चेंगराचेंगरीचे कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये उत्तर रेल्वेचे PCCM नरसिंग देव आणि PCSC उत्तर रेल्वेचे पंकज गंगवार यांचा समावेश आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या व्हिडिओ फुटेजसह सर्व उपलब्ध पुराव्यांचे विश्लेषण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत.


हेही वाचा… Death Threat to Shweta Mahale : एकनाथ शिंदेंपाठोपाठ भाजपच्या महिला आमदारांना जीवे मारण्याची धमकी