Covid-19 Effect: येत्या १७ मेपासून बंद होणार दिल्ली एअरपोर्टचं टर्मिनल-२; जाणून घ्या कारण

प्रातिनिधीक फोटो

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल -२ मधील उड्डाण १७ मेपासून तात्पुरते थांबवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे उड्डाणांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, १७ मे रोजी मध्यरात्रीपासून टर्मिनल-३ मधून सर्व उड्डाण सुरू राहतील. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मेपासून सर्व एअरलाईन्सची उड्डाणं टर्मिनल-३ वर स्थलांतरित करण्यात येणार आहे.

सध्या दिल्ली विमानतळावरून एका दिवसात साधारण ३२५ उड्डाण सुरू आहे. कोरोना महामारीच्या आधी या विमानतळावरून सुमारे १ हजार ५०० उड्डाणे सुरू होती. विमानतळावरील सध्याची प्रवाशांची संख्या कमी होऊन तीस हजारांच्या जवळपास खाली घसरली आहे. कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम भारताच्या एविएशन सेक्टरवर झाला आहे. त्यामुळेच दिल्ली विमानतळाने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही आठवड्यांत स्थानिक प्रवाशांची संख्या दिवसाला २.२ लाखांवरून कमी झाली असून आता ती ७५ हजारांपर्यंत आली आहे. दुसर्‍या लाटेनंतर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्याही लक्षणीय घटली आहे. बर्‍याच देशांनी वेगाने वाढणार्‍या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतातून येणार्‍या प्रवाशांसह भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे सध्या काही दिवसांसाठी टर्मिनल -३ वरून देशांतर्गत उड्डाणे चालविली जाणार आहे.

कोरोना संसर्गाच्या आधी, दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक प्रति दिन सुमारे १ हजार ३०० होती, जी आता कमी होऊन २५० ते ३०० उड्डाणांवर आली आहे. मागील वर्षी, मे महिन्यात केवळ दोन महिन्यांसाठी उड्डाणांवर पूर्ण बंदी घालल्यानंतर टर्मिनल ३ वरून उड्डाणं सुरू करण्यात आली होती. तर १ ऑक्टोबर २०२० पासून टर्मिनल -२ वरून उड्डाणे सुरू करण्यात आली होती. देशातून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मे पर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.