Homeदेश-विदेशDelhi Assembly Election : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठीच्या मतदानाला सुरुवात, पंतप्रधानांचे मतदारांना...

Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठीच्या मतदानाला सुरुवात, पंतप्रधानांचे मतदारांना आवाहन

Subscribe

बहुचर्चित अशा दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी (ता. 05 फेब्रुवारी) मतदान पार पडत आहे. दिल्लीतील 70 विधानसभेच्या जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली : बहुचर्चित अशा दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी (ता. 05 फेब्रुवारी) मतदान पार पडत आहे. दिल्लीतील 70 विधानसभेच्या जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे दिल्लीत मतदार असल्याने त्यांनी सकाळी 8.30 वाजताच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दिल्लीतील 70 विधानसभेच्या जागांसाठी एकूण 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांचे भवितव्य 1.56 कोटी मतदार ठरवणाप आहेत. तर या निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. पण अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केले आहे. (Delhi Assembly Election: Voting for 70 seats begins, PM Narendra Modi appeals to voters)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिल्लीतील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व जागांसाठी आज मतदान होणार आहे. मी येथील मतदारांना लोकशाहीच्या या उत्सवात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचे आणि त्यांचे मौल्यवान मतदान करण्याचे आवाहन करतो. या प्रसंगी, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सर्व तरुण मित्रांना माझ्या विशेष शुभेच्छा. लक्षात ठेवा- आधी मतदान करा, मग अल्पोपहार!”

तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या माझ्या बहिणींना आणि भावांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी खोट्या आश्वासनांविरुद्ध, प्रदूषित यमुना, दारूची दुकाने, तुटलेले रस्ते आणि घाणेरडे पाणी या विरोधात मतदान करावे. आज एक असे सरकार बनविण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा, ज्याकडे सार्वजनिक कल्याणाचा मजबूत इतिहास असलेले आणि दिल्लीच्या विकासासाठीचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. तुमचे एक मत दिल्लीला जगातील सर्वात विकसित राजधानी बनवू शकते.”

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत प्रवेश करता येणाऱ्या सीमा सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत. दिल्लीत येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा दल चोख बंदोबस्त ठेवून आहेत. मतदान केंद्रांवर देखील विविध स्तरांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने निमलष्करी दलाच्या 220 कंपन्या, दिल्ली पोलिसांचे 35 हजार 656 जवान आणि 19 हजार होमगार्ड तैनात करण्यात आले असून 42 ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे.