नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भारतीय जनता पक्षाने आम आदमी पार्टीवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. दिल्ली विधानसभेत आज मद्य वितरण धोरणावर कॅग (CAG) चा अहवाल सादर करण्यात आला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी अहवाल सादर केला. नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना म्हणाले, मागील सरकारने हा अहवाल रोखून धरला होता. सभागृहात सादर केला नाही. त्यांनी संविधानाचे खुलेआम उल्लंघन केले.
कॅगच्या अहवालात म्हटले आहे की, नवीन मद्य वितरण धोरणामुळे दिल्ली सरकारला दोन हजार कोटींचे नुकसान झाले आहे. केजीरवाल सरकारने आणलेले धोरण हे चुकीचे होते, त्यासोबतच परवाने वितरणात अनियमितता झाली. एक्सपर्ट्सच्या सूचनांचेही पालन करण्यात आले नाही. तत्कालिन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्व सूचनांकडे कानाडोळा केला होता.
मित्रांना ठेके दिले…
कॅगच्या अहवालावरुन भाजपने आपवर निशाणा साधला आहे. कॅगचा अहवाल सादर झाल्यानंतर दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले, कॅगच्या अहवालातून स्पष्ट झाले की, अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मित्रांना दारुचे काम देण्यामुळे सरकारचे 4004 कोटी रुपयांचे नुकसान झाले. केजरीवालांनी त्यांच्या मित्रांना मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये 1-1 टक्का पार्टनरशिप देऊन त्यांना दारुचे ठेके दिले होते. कॅगच्या अहवालातून त्यांचे हे सर्व घोटाळे उघड झाले आहेत.
मुख्यमंत्री निवासस्थानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगत सिंग यांचे फोटो हटवले
कॅगचा अहवाल सभागृहात सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री निवासस्थानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगत सिंग यांचे फोटो काढण्यावरुन विरोध पक्षाने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नायब राज्यपालांचे अभिभाषण सुरु असताना गदारोळाला सुरुवात झाली. सभागृहातील या गदारोळामुळे विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आपच्या 12 आमदारांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले.
आप आमदारांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षनेत्या आतिशी म्हणाल्या, की मुख्यमंत्री निवासस्थानातील भगतसिंह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो का हटवण्यात आले. पंतप्रधान मोदी हे बाबासाहेबांपेक्षा मोठे आहेत का? असा संतप्त सवाल आतिशी यांनी उपस्थित केला. आम आदमी पार्टीचे दिल्ली आणि पंजाबात सरकार आल्यानंतर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्यात आले होते.
हेही वाचा : Mumbai Metro : मेट्रोशी संबंधित कंपनीकडून भ्रष्टाचाराचे आरोप, आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा