दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने न्यायालयात 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू कोर्टात केजरीवाल यांना हजर करण्यात आलं होतं. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना काल, गुरुवारी दोन तासांच्या चौकशीअंती ईडीने अटक केली.
ईडीने दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी दुपारी राऊज अव्हेन्यू कोर्टातील विशेष सीबीआय न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू झाली. केजरीवाल यांची चौकशी करण्यासाठी ईडीने कोर्टाकडे 10 दिवसांची रिमांड मागितली. तसंच, ईडीने कोर्टासमोर केजरीवाल हेच मद्य घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा युक्तीवाद केला आहे. यापूर्वी केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका मागे घेतली होती. अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, रिमांडचा विरोध असल्याने केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात याचिका मागे घेत आहेत.
ईडीने गुरुवारी रात्री केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानावर छापा टाकून त्यांना अटक केली. रात्री उशिरा केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी सुमारे 4 तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर ईडीचे पथक त्यांना सोबत घेऊन गेले. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीची ही 16वी अटक आहे. मुख्यमंत्र्यांना पदावर असताना अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे.
ईडीने या प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपपत्रे दाखल केली असून 128 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी ईडीने जारी केलेले नऊ समन्स केजरीवाल यांनी टाळले होते. यापैकी गुरुवार 21 मार्च रोजी नवीन समन्स जारी करण्यात आला. त्यांनी हे समन्स ‘बेकायदेशीर’ असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 15 मार्च रोजी, ईडीने भारत राष्ट्र समिती (BRS) नेते आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता हिलाही दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात अटक केली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केजरीवाल यांच्या अटकेवर आम आदमी पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील, असे आपने म्हटले आहे. गरज पडली तर तुरुंगातून सरकार चालवणार, असं आपकडून सांगण्यात येत आहे. मात्र, भाजपने नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचा: Loksabha 2024: शिर्डीत उद्धव ठाकरेंना धक्का; भाऊसाहेब कांबळेंचा शिंदे गटात प्रवेश )